मोहनीराज लहाडे
नगर : काही दिवसांपूर्वीची नेवासे बुद्रुक गावातील घटना. महावितरणची तार अचानक तुटली, शॉर्टसर्किट झाले आणि दत्ता नवले यांच्या तीन एकर शेतातील गाळपाच्या प्रतीक्षेतील उभा ऊस जळून खाक झाला. सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणमुळे त्यांच्या शेतातील पीक जळून खाक होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. सन २०१२ पासूनची ही तिसरी घटना आहे.
आग लागल्याने हातातोंडाशी आलेले केवळ पीकच जळाले असे नाही तर त्यासोबत नवले यांचा ट्रॅक्टर, ठिबक सिंचन पाइपही जळून मोठे नुकसान झाले. मात्र महावितरणचा दोष असूनही त्यांना एकाही जळिताची अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे न्यायालयात, ग्राहक मंचात दाद मागण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. महावितरणच्या तारा ३५ ते ४० वर्षांपूर्वीच्या आहेत, तारांना झोळ पडले आहेत, देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे, त्यातून ठिणग्या उडण्यासारखे प्रकार घडतात आणि आग लागते. हा अनुभव केवळ नवले यांचाच नाहीतर बहुसंख्य शेतकऱ्यांचा आहे.
महावितरणच्या माहितीनुसार दरवर्षी नगर जिल्ह्यात अशा किमान चाळीस ते पन्नास अशा घटना घडतात. गेल्या एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यानच्या वर्षभराच्या कालावधीत महावितरणच्या दोषामुळे शेतातील पिकांना आगी लागल्याच्या ३९ घटना जिल्ह्यात घडल्या, यातील नुकत्याच झालेल्या दोन घटनांची नोंद महावितरणकडे अद्याप झालेली नाही. यातील केवळ १८ ठिकाणच्या आगीचे विद्युत निरीक्षकांचे अहवाल महावितरणला प्राप्त झाले आहेत. केवळ एक अपवादाची घटना वगळता इतर सर्व म्हणजे १७ ठिकाणच्या आग लागण्याच्या कारणांमध्ये महावितरण दोषी असल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. १९ ठिकाणचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. मात्र नुकसानभरपाई अजून एकालाही मिळाली नाही.
चौकशी अहवाल प्राप्त झालेल्या सतरापैकी सात ठिकाणची कारणे ही महावितरणचे देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगतात. उर्वरित दहा ठिकाणच्या आगीमध्ये महावितरण दोषी असले तरी त्यास इतर कारणे जबाबदार आहेत. आगीच्या बहुसंख्य घटनात ऊस भक्ष्यस्थानी पडला आहे. साखर कारखान्यांनी गाळपाला नेण्यास उशीर केला की आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा धोकाही वाढतो. सोनईमध्ये तर वीस एकर ऊस जळून गेल्याचेही उदाहरण आहे. शेतातील वाकलेले खांब, शेतातून जाणाऱ्या लोंबकळणाऱ्या, झोळ पडलेल्या तारांचे होणारे घर्षण, रोहित्रातून गळणारे ऑइल, चिनीमातीचा कप (कंडेन्सर) खाली पडून ठिणग्या उडणे अशीही कारणे समोर आली आहेत. काहीवेळा वादळासारखी नैसर्गिक आपत्तीही महावितरणला हातभार लावते.
आग लागली की, महावितरणला कळवणे, पोलीस व महसूलचा पंचनामा, विद्युत निरीक्षकाचा अहवाल, सातबाऱ्यावरील पिकाची नोंद, कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस घातल्याची नोंद, नुकसान किती झाले याचा कृषी विभागाचा अहवाल अशी कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागते, महावितरणकडे भरपाईसाठी अर्ज करावा लागतो, नंतर शेतकऱ्यांच्या हाती उरते ते केवळ महावितरणकडे भरपाईसाठी पाठपुरावा करावा लागणारे हेलपाटे. मंजुरी मुख्यालयाचीही मिळवावी लागते.
माझ्या शेताजवळील रोहित्रातून तीन गावांना वीजतारा जातात. या तारांना ठिणग्या उडून, तारा तुटून आग लागण्याच्या २०१२ पासून तीन घटना घडल्या. मात्र पाठपुरावा करूनही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. तारा अत्यंत जुन्या आहेत. तक्रार करूनही त्या बदलल्या गेल्या नाहीत.
– दत्ता नवले, शेतकरी, नेवासा बुद्रुक.
बहुतेक ठिकाणी वाकलेले खांब, रोहित्रातून गाळणारे ऑइल, लोंबकळणाऱ्या तारांतून पडणाऱ्या ठिणग्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात. जळाल्याव्यतिरिक्त उर्वरित उसालाही कारखाने अत्यंत कमी भाव देतात. म्हणजे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते. भरपाईसाठी कागदपत्रे गोळा करणे आणि पुन्हा पाठपुरावा करत राहणे शेतकऱ्यांना हैराण करून टाकते.
-बाळासाहेब पठारे, शेतकरी संघटना अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र.
महावितरणच्या कारणाने शेतातील पिकांना आग लागण्याच्या गेल्या वर्षभरात ३७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १८ तक्रारींमध्ये अहवाल प्राप्त झाले आहेत. एकामध्ये महावितरणचा दोष नसल्याचे निष्पन्न झाले. नऊ जणांनी भरपाईसाठी अर्ज केले नाहीत. उर्वरित आठ जणांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. शेतातील वीजखांब वाकले असल्यास, तारांना झोळ पडले असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणला कळवावे, त्याची दखल घेतली जाईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज करावेत.
-सुनील काकडे, अधीक्षक अभियंता महावितरण, नगर.