पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करणाऱ्या राज्यभरातील १६ शहरांतील जवळपास ६४ ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाने बुधवारी सकाळी सुरू केलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती सूत्रांकडून समजते.
केंद्र सरकारने काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर काळा पैसा पांढरा करणाऱ्यांभोवती आयकर विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. देशभरात विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली. आयकर विभागाने सुरू केलेले छापेमारीचे सत्र सुरूच आहे. आता आयकर विभागाने बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करणाऱ्या ज्वेलर्सकडे कारवाईचा मोर्चा वळवला आहे. आयकर विभागाच्या पथकांनी दिवसभरात राज्यातील १६ शहरांतील ६४ ज्वेलर्सवर छापे टाकले. त्यात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, वर्धा, अकेला, नाशिक, खामगाव, पालघर, वसई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भाईंदर आणि डोंबिवलीतील ज्वेलर्सचा समावेश आहे. यात पुण्यातील सर्वाधिक म्हणजेच १३ ज्वेलर्सचा समावेश आहे.
दरम्यान, आयकर विभागाने बुधवारी सकाळी सुरू केलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती, असे आयकर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येते. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारून त्यानंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा केल्याचा संशय असल्यामुळे आयकर विभागाने या ज्वेलर्सवर छापे टाकल्याचे सूत्रांकडून समजते.
या ठिकाणी केली कारवाई
पुणे १३, कोल्हापूर ३, सोलापूर ५, नागपूर ९, अमरावती २, वर्धा २,अकोला ४, नाशिक ७, खामगाव १, पालघर २, वसई १, ठाणे ५, कल्याण ४, उल्हासनगर २, भाईंदर १ आणि डोंबिवली १ .