चारापाण्याच्या शोधात जंगलालगतच्या गावाकडे येतात; बचाव पथकासाठी नवेच आव्हान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशांत देशमुख, वर्धा

चारापाण्याच्या शोधात लगतच्या गावाकडे वळणाऱ्या वन्यप्राण्यांचे वाढते अपघात वनखात्यासाठी चिंतेची बाब ठरत असून बचाव पथकाची धाव व उपचाराचे कार्य एक नवेच आव्हान ठरले आहे.

वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती अशा जिल्हय़ाच्या सीमा असणाऱ्या बोर अभयारण्यातील वन्यप्राण्यांची भटकंती नेहमीचीच आहे. वाघ, बिबट, चितळ, सांबर, अस्वल, नीलगाय, रानडुक्कर, नीलगायींनी समृद्ध या वन्यप्रदेशात आता खाद्य ही मोठी समस्या ठरू लागत आहे. गेल्या फे ब्रुवारीत व मार्चच्या पहिल्या आठवडय़ात आठ प्राण्यांच्या जीवावर बेतले होते. कारंजा तालुक्यातील एकपाळय़ात तब्बल आठ नीलगायी विहिरीत पडल्या होत्या. त्यात पाच दगावल्या. तळेगावला पाण्याच्या शोधात आलेल्या हरिणाचा जंगली कुत्र्यांनी फ डशा पाडला. कारंजालगत महामार्गावर पाच नीलगायी कारला धडकल्या. आष्टी तालुक्यातील तारासावंगा येथे बिबटय़ावर गावकऱ्यांनी हल्लाबोल केला. गिरड परिसरात वाघाच्या धुमाकुळाने गावकरी त्रस्त झालेत. समुद्रपूर तालुक्यात अस्वल विहिरीत पडले. या अपघातांची मालिका संपता संपत नसल्याने वनखाते चिंताग्रस्त आहेत.

हे अपघात प्रामुख्याने खाद्यासाठी होत असल्याचे वनविभागाचे निरीक्षण आहे. जंगल विरळ होत चालले आहे. चारा उपलब्ध नाही. त्यामुळे लगतच्या शेतशिवारात भटकंती वाढते. दाणेदार पिकांकडे नीलगायींचा वाढता ओढा असतो, तर कुत्रे हे बिबटचे आवडते खाद्य आहे. ते शोधत असताना दोन बिबट वेगवेगळय़ा विहिरीत पडण्याच्या घटना घडल्या. जंगलातील विहिरीभोवती कठडे लावण्याचे काम झाले. आता गावाभोवती असणाऱ्या विहिरींना कठडे लावण्याचे काम वनखात्याने हाती घेतले आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे, पण यासाठी राज्यपातळीवर विशेष धोरण नसल्याचे सांगण्यात आले. अपघातात सापडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या बचावार्थ एक पथक तयार करण्यात आले आहे. प्रादेशिक वनविभागात वर्धा, अमरावती व बुलढाणा या तीन जिल्हय़ांसाठी बचावपथक आहेत. अभयारण्यात ते अस्तित्वात आहेच. या पथकाने बिबट, अस्वल व नीलगायींचे प्राण वाचवले, पण काही प्राण्यांचा बळी गेलाच.

गाव शिवाराकडे भटकणाऱ्या वनप्राण्यांसाठी एक ड्रोन आणण्यात आले आहे. त्या माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे, पण शेकडो एकर परिसरातील भ्रमंतीवर निगराणी ठेवण्यास ते अपुरेच ठरावे. परिसरात यावर्षी पाणीटंचाईचे सावट मोठय़ा प्रमाणात आहे. ६० टक्केच पाऊस झाला. शहर व ग्रामीण भागात जाणवणारी पाणीटंचाई जंगलातही जाणवू लागली आहे. जंगल भागातील पाणवठे, नाल्या, विहिरी कोरडय़ा पडू लागल्याने पाण्याच्या शोधार्थ तहानलेले वन्यजीव गावाकडे ओलावा शोधू लागतात. जुन्या पद्धतीच्या विहिरींना कठडे नसल्याने प्राणी थेट विहिरीत पडतात. ओरड झाली तरच बचावपथक वेळेवर पोहोचू शकतो. अन्यथा हे प्राणी तडफ डून दगावतात. काही लगतच्या जलाशयाकडे धावे घेतात, पण त्यामुळे मनुष्यवस्त्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडू लागल्याने परत ओरड वाढली. आता वनपरिसरातच दरवर्षीप्रमाणे पाणवठे टँकरने भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. पण खाद्यासाठी प्राण्यांची भ्रमंती व त्यातून होणारे अपघात, ही एक नवीच समस्या आता उद्भवली आहे. विभागीय वनसंरक्षक सुमीत शर्मा हे म्हणाले की, वन्यप्राण्यांच्या वर्तनाबाबत निश्चित ठोकताळा काढता येत नाही. खात्याकडून विविध उपाय होत आहे, पण प्राणी विहिरीत पडण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने विहिरींभोवती संरक्षक कठडे लावण्याचे काम आम्ही आपल्या पातळीवर हाती घेतले आहे. अपघात कमी होण्याची अपेक्षा आहे, पण आता गावकऱ्यांचेही सहकार्य अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing accidents of wild animals is matter of concern for the forest
First published on: 06-03-2019 at 02:06 IST