पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील २६ विरोधी पक्षांनी I.N.D.I.A. अर्थात इंडिया नावाने आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अर्थात आज व उद्या मुंबईत बैठक होत आहे. एकीकडे या बैठकीत जागावाटप, आघाडीचे मुख्य समन्वयक, पंतप्रधानपदाचा चेहरा, निवडणुकीची रणनीती यावर गंभीर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, दुसरीकडे या बैठकीसाठी असणाऱ्या अस्सल मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागातून आलेली प्रमुख नेतेमंडळी मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसणार आहेत.
महाविकास आघाडीकडून नियोजन
मुंबईत ही बैठक होत असल्यामुळे महाविकास आघाडीकडून या बैठकीचं संपूर्ण नियोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या गँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत असून तिथे बुधवारी मविआच्या काही नेत्यांनी प्रत्यक्ष जाऊन सर्व तयारीचा आढावाही घेतला होता. त्यामुळे बैठक व्यवस्थित पार पडावी याची काळजी मविआचे नेते घेताना दिसत आहेत.
नाश्त्याला वडापाव, जेवणाला झुणका-भाकर!
दरम्यान, बैठकीतील पदार्थ्यांची सध्या चर्चा असून बैठकीच्या सुरुवातीलाच नाश्त्यासाठी मराठमोळा मुंबई स्पेशल वडापाव असणार आहे. त्यासोबत बाकरवडी, नारळी वडी, नारळाची करंजी, दुधी मावा मोदक आणि नाचणीचे वेफर्स दिले जाणार आहेत. सोबत चहा, कॉफी, नारळपाणी, लिंबूपाणी व फ्रूट ज्यूसही असणारर आहे.
नाश्त्याला मुंबईचा वडापाव असताना दुपारच्या जेवणासाठी झुणका-भाकरचा मेन्यूमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर राज्यातील पाहुण्या नेतेमंडळींना अस्सल मराठमोळ्या पुरणपोळीवरही ताव मारता येणार आहे. विशेष म्हणजे, पुरणपोळ्या आधी तयार केलेल्या नसून तिथल्या तिथे गरम गरम पुरणपोळ्या करून दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रात्रीच्या जेवणासाठी व्हेज-नॉन व्हेज
दरम्यान, नाश्ता व दुपारच्या जेवणानंतर रात्रीच्या जेवणासाठी शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

मनसेची टीका
इंडिया आघाडीच्या बैठकीला मराठमोळ्या पंचपक्वान्नांची रेलचेल असताना मनसेनं यावर टीका केली आहे. “राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.A. आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत.शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही”, अशी टीका मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केली आहे.