भुजबळ फाऊंडेशनच्या ‘नाशिक फेस्टीव्हल’साठी मुक्तहस्ते देणगी देणाऱ्या इंडिया बुल्सने यंदाच्या चौथ्या महोत्सवापासून स्वत:ला पूर्णपणे अलिप्त ठेवल्याचे उघड झाले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सदैव चर्चेत असलेल्या इंडिया बुल्सने काही वर्षांपूर्वी नाशिक फेस्टीव्हलसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची देणगी भुजबळ फाऊंडेशनला दिली होती. इंडिया बुल्स आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील सौहार्दाचे संबंध तेव्हां ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. गतवर्षी दुष्काळामुळे हा महोत्सव झाला नाही. यंदाच्या चौथ्या नाशिक फेस्टीव्हलच्या प्रायोजकत्वांमधून इंडिया बुल्सने पूर्णपणे माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या महोत्सवाचे मुख्य प्रायोजकत्व आता सिंडिकेट बँक सांभाळत आहे.
भुजबळ फाऊंडेशनच्यावतीने चार ते १८ जानेवारी या कालावधीत चौथ्या ‘नाशिक फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम, मान्यवरांचे सत्कार सोहळे असे एकूण त्याचे स्वरुप आहे. या बाबतची माहिती सोमवारी फाऊंडेशनच्या वतीने खा. समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा फेस्टीव्हलचे प्रायोजकत्व सिंडिकेट बँकेने स्वीकारल्याचे सांगण्यात आले. म्हणजे, इंडिया बुल्स या महोत्सवापासून लांब राहिल्याचे स्पष्ट झाले. सिन्नर तालुक्यात २७०० मेगावॉटचा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आणि विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) साकारणारी इंडिया बुल्स रिअलटेक कंपनी वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. या प्रकल्पांसाठी औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाने प्रारंभापासून भलताच रस दाखविला. भूसंपादनावेळी पोलीस यंत्रणेला हाताशी धरुन विरोध होणार नाही याची दक्षता घेतली गेली अशी स्थानिकांची भावना आहे. वीज प्रकल्पासाठी पाण्याचे आरक्षण मिळविताना कंपनीने नाशिक महापालिकेला कात्रजचा घाट दाखविला होता. त्यानंतर या प्रकल्पाच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करताना महसूल व पोलीस यंत्रणा इंडिया बुल्सच्या दावणीला बांधले गेल्याचे पहावयास मिळाले होते.
याच इंडिया बुल्सने काही वर्षांपूर्वी नाशिक फेस्टीव्हलसाठी भुजबळ फाऊंडेशनला अडीच कोटी रुपयांची देणगी दिल्याचे ‘लोकसत्ता’ने उघड केले होते. यावर प्रकाशझोत पडल्यानंतर प्रचंड गदारोळ उडाला. त्यामुळे ‘नाशिक फेस्टिव्हल’च्या तिसऱ्या पर्वाची माहिती देणाऱ्या कार्यक्रम पुस्तिकेत इंडिया बुल्सचा उल्लेख कुठेच येणार नाही, याची खबरदारी संयोजकांनी घेतली गेली होती. आता चौथ्या फेस्टीव्हलमधून इंडिया बुल्सला बाद करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवा प्रायोजक शोधून भुजबळ फाऊंडेशनने हा महोत्सव रंगतदार करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
‘नाशिक फेस्टीव्हल’ पासून यंदा इंडिया बुल्स दूर
भुजबळ फाऊंडेशनच्या ‘नाशिक फेस्टीव्हल’साठी मुक्तहस्ते देणगी देणाऱ्या इंडिया बुल्सने यंदाच्या चौथ्या महोत्सवापासून स्वत:ला पूर्णपणे अलिप्त ठेवल्याचे उघड झाले आहे.

First published on: 31-12-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indiabulls far away from nashik festival