IPS Anjana Krishna: राजकीय नेत्यांसाठी आंदोलन झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. पण एखाद्या नवख्या अधिकाऱ्यासाठी काही लोक रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करण्याची घटना करमाळ्यात घडली आहे. यापूर्वी बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. त्याच प्रकारची प्रसिद्धी आता अंजना कृष्णा यांना मिळताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना खडसावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ करमाळ्यातील जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उतरले आहेत.
अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या अंजना कृष्णा यांच्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने आंदोलन केले. तसेच त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक केला. अंजना कृष्णा यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हे निदर्शन करण्यात आल्याचे जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले.
अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ करमाळयाचे आराध्य दैवत आई कमलाभवानीलाही यावेळी प्रार्थना करण्यात आली. लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली.
We Stand With Anjana Krishna, अजित पवार माफी मागा, अशा घोषणाबाजी देत शेतकऱ्यांनी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. हा शिवरायांचा महाराष्ट्र असून येथे महिलांचा सन्मान केला जातो, अशा आशयाचे बॅनरही झळकविण्यात आले.
नेमके प्रकरण काय?
सोलापूरमधील मुरूमाच्या उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी अजित पवार म्हणाले होते, “ऐका, मी उपमुख्यमंत्री बोलत आहे. मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई रोखा.”
मात्र कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन आल्यामुळे पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखले नाही आणि त्यांनी आपल्या फोनवर फोन का नाही केला? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी तुमच्यावर कारवाई करू, तुमची एवढी डेअरिंग वाढली का?, असे संतापून म्हटले.
“तुम्हाला मला पाहायचे आहे का? तुमचा मोबाइल नंबर द्या, तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतो आणि माझा चेहरा दाखवतो. तुमची एवढी हिंमत झाली का?”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यानंतर अंजना कृष्णा यांना व्हिडीओ कॉल करून अजित पवार यांनी त्यांना कारवाई रोखण्याचे थेट आदेश दिले.