सांगली : सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत १७.२२ टक्क्यांनी वाढून २ लाख ७२ हजार २२ झाले आहे. शेती व संलग्न क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये ३ हजार ७७ कोटींची वाढ असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे आशादायक चित्र आहे. जिल्ह्याचा वीज वापरही वाढला असून सिंचन सुविधा हेच यामागील महत्त्वाचे कारण आहे. सांगली जिल्ह्याचे दोन विभाग असून पश्चिम भागात बारमाही वाहणाऱ्या कृष्णा-वारणा नद्यांचा सुपीक भाग आणि अल्प पावसाचा पूर्वेकडील भाग. मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये ताकारी, टेंभू, म्हैसाळ आणि आरफळ योजनेतून पाण्याची उपलब्धता झाल्याने पूर्व भागातील माळरानेही आता हिरव्या पिकांनी डोलू लागली आहेत. औद्याोगिक प्रगतीमध्ये सहकारी, खासगी क्षेत्रातील साखर कारखान्याच्या माध्यमातून उद्यामशीलता दिसत असली तरी औद्याोगिक वसाहतीमध्ये कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे कोणतेही मोठे प्रकल्प नाहीत. उसामुळे पश्चिम भाग सधन झाला असून द्राक्ष, डाळिंबांमुळे दुष्काळी भागाला गेल्या काही वर्षांत प्रगतीच्या वाटेवर आणले आहे

मिरज तालुक्याचा पश्चिम भाग, वाळवा, शिराळा, पलूस हे तालुके नदीकाठी असल्याने आणि कृष्णा-वारणा खोऱ्यातील बारमाही पाण्याचा लाभ घेऊन या परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऊस शेतीबरोबरच या भागात दुग्ध उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. भिलवडी परिसरातील दुधाचा व्यवसाय जोरात आहे.

जत, आटपाडी या दुष्काळी आणि माणदेशाशी संपर्क असलेल्या तालुक्यात शेळीमेंढीची जोपासना हा शेतीला पूरक उद्याोग आहे. माडग्याळी मेंढी तर मांसासाठी प्रसिद्ध आहे. यातून बारमाही पाण्यासाठी वंचित असलेल्या या भागात अर्थार्जनाचे दालन खुले झाले आहे.

द्राक्ष, बेदाणा उत्पादनात आघाडी

तासगावने तर द्राक्ष आणि बेदाणा उत्पादन आणि विक्रीमध्ये आघाडी घेतली आहे. उत्तम दर्जामुळे तासगावच्या बेदाण्याला भौगोलिक मानांकनही मिळाले. बेदाणा साठवणुकीसाठी शीतगृहांची साखळीही निर्माण झाली असून तोही एक व्यवसाय नव्याने निर्माण झाला आहे.

वाहतूक सुविधांमुळे बळ

राज्यात लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्रामध्ये सांगलीचा १६ वा क्रमांक आहे. एकूण लोकसंख्येपैकी ७४.५० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. सिंचनाच्या वाढलेल्या सुविधांमुळे भांडवली उत्पादन गेल्या दहा वर्षांत ३.११ टक्के वाढले आहे. दरडोई उत्पन्न २०२१-२१ मध्ये २ लाख ३२ हजार २५८ रुपये होते. आता २०२३-२३ मध्ये ते २ लाख ७२ हजार २२ रुपये झाले आहे. तरी कृषिपूरक उद्याोगाच्या वाढीसाठी भरपूर वाव आहे. नागपूर-रत्नागिरी, मनमाड-जत, गुहागर-जत हे राष्ट्रीय महामार्ग दुष्काळी भागासह दुष्काळी भागाच्या विकासाला आणि शेती उत्पादनाच्या निर्यातीला पूरक ठरणारे आहेत.

कृषी क्षेत्रात विविध प्रयोग

जत, आटपाडी या कमी पावसाच्या प्रदेशात खडकाळ जमीन असल्याने या ठिकाणी कमी पाण्यात येणारे आणि रसदार डाळिंब मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आटपाडीतील गणेश, भगवा या डाळिंबाच्या जातीने परदेशातही स्थान निर्माण केले आहे. आता डाळिंबानंतर या भागातील शेतकरी केसर आंबा पिकाकडेही वळू लागला आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि आरफळ सिंचन योजनेचे पाणी दुष्काळी भागात आल्याने शेतीची व्यवस्था अधिक शाश्वत उत्पादनाकडे निघाली आहे.

दृष्टिक्षेपात

● क्षेत्रफळ- ८,५७८ चौरस किलोमीटर

● भौगोलिक क्षेत्र- ८६१० हे.

● पिकाखालील क्षेत्र- ५३९१.४९ हे.

● सिंचनाखालील क्षेत्र- ३६३८.९० हे.

● लोकसंख्या- २८,२०,५७५ (२०११ ची जनगणना)

● तालुके – १०

● नद्या- कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी, माण, बोर

● धरणे- चांदोली, राजेवाडी, संख मध्यम प्रकल्प

● औद्याोगिक वसाहती- 

● साखर कारखाने- सहकारी १०,

खासगी ५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूतगिरण्या-४