Eknath Shinde on Irshalwadi Landslide Victims : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथल्या परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत १०३ लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं असून १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणाले, काही नागरिक भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी ५० ते ६० कंटेनर्सची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील केलं जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दुर्घटनाग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं असून त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ५० ते ६० कंटेनर्स आणण्यात आले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी त्यांची व्यवस्था केली जाईल. तसेच त्यांचं कायमचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यासंबंधी पुढील कार्यवाहीदेखील युद्ध पातळीवर करू.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली असल्याने आणि मदतीसाठी कोणतीही साधने इथे आणणं शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष बचावकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस अशा परिस्थितीतही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य तितके प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा >> पायाखाली पक्का रस्ता नाही, वरून पावसाला खंड नाही… रायगड दरड दुर्घटनेत बचाव पथकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’!
हे ही वाचा >> Raigad Landslide: ..आणि शाळकरी मुलांमुळे गाव जागा झाला! प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं ठाकूरवाडीत नेमकं काय घडलं
मदतकार्यात मुख्यमंत्र्यांचाही हातभार
प्रतिकुल परिस्थितीमुळे पुरेशी यंत्रणा डोंगरावर मदतकार्यासाठी जाऊ शकत नव्हती. यावेळी मुख्यमंत्री स्वतः तिथे हजर राहून अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश आणि वेगवेगळ्या सूचना देत होते. तसेच त्यांनी दीड तास पायपीट करू इर्शाळवाडी गाठली. याचदरम्यान, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसरातील सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक संस्था यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली.
