देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. आज ते पश्चिमी क्षेत्रीय परिषद बैठक घेणार आहेत. या बैठकीत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

गुजरातला जाणं हा अपराध आहे का? गुजरात हे गृहमंत्र्यांचं राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे ते पॉलिटिकल बॉस आहेत. एक काळ असा होता की महाराष्ट्रात सर्व ठरवलं जायचं. महाराष्ट्रत हायकमांड होतं. महाराष्ट्र देशाला दिशा देत असे. आता नव्या सिस्टिमनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गुजरातला जावं लागतंय. गुजरातचे मित्र आपले बांधव आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

“आता महाराष्ट्रात काही राहिलं नाही. सर्व बाहेर जातंय. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निर्णय घ्यायला गुजरात किंवा दिल्लीला जावं लागतंय”, अशी खंतही संजय राऊतांनी बोलून दाखवली.

…तर सत्तेतून बाहेर पडा

आम्हाला सत्तेची हाव नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (२७ ऑगस्ट) बीडमध्ये म्हटलं. त्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “आम्हाला सत्तेची हाव नाही, असं तुम्ही म्हणता. जर तुम्हाला सत्तेची हाव नाही मग कशाला मंत्रिपदाची शपथ घेतली? बाहेर पडा आणि सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घ्या. या महाराष्ट्रात सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. पण तुम्हाला मंत्रिपदच का पाहिजे? सत्ताच का पाहिजे? भाजपाची गुलामीच का हवी? असे प्रश्नही त्यांनी अजित पवारांना विचारले.