भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगड येथे ‘दसरा मेळावा’ पार पडला. या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी चौफेर टीका केली. २०२४ च्या निवडणुकीबाबतही सूचक विधान त्यांनी केलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भर सभेत ‘देश भ्रष्टाचारमुक्त झाला का?’ असा सवालही विचारला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता? यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “राज्यात शेतकऱ्यांना न्याय देणारं, महिलांना सन्मान देणारं सरकार हवं आहे. राज्यात जाती-जातींमध्ये आतंक पसरला आहे. याला विराम देऊन प्रत्येकाला कुशीत घेऊन कुरवाळणाऱ्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. जाती-पातीच्या भिंती तोडून राजकारण करण्याची गरज आहे. देश भ्रष्टाचार मुक्त झाला का? भ्रष्टाचारातून आपण वाचलो का? तुमच्या मताला काही किंमत आहे का? तुम्ही कुणाला मत द्याल आणि सरकार कुणाचं येईल, यावर तुमचं काहीही नियंत्रण नाही. राज्यात आता स्थिरता हवी आहे, या स्थिरतेसाठी मी प्रयत्न करणार आहे.”

हेही वाचा- “आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू”, भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडेंचा निशाणा; रोख कोणावर?

“गोली का जबाब गोली से दो”

दरम्यान, राज्यातील ड्रग्ज तस्करी प्रकरणावर भाष्य करताना पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “मागील कित्येक दिवसांपासून टीव्हीवर ड्रग्जबाबत बातमी सुरू आहे. ड्रग्ज कुणी आणलं? कुणी घेतलं? कुणाच्या मुलाने घेतलं? कुणाच्या काळात आलं? असं म्हणण्याला आता काही अर्थ नाही. गोपीनाथ मुंडेसाहेबांनी जेव्हा अंडरवर्ल्डशी सामना केला होता. तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं, ‘गोली का जबाब गोली से दो’. कारण अंडरवर्ल्डचे लोक पोलिसांना गोळ्या घालत असतील तर पोलीसही त्यांना गोळ्या घालू शकतात, हे धारिष्ट मुंडेसाहेबांनी दाखवलं.”

हेही वाचा- “प्रीतमताई घरी बसतील अन्…”, बहिणीच्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर पंकजा मुंडेंची रोखठोक भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तेव्हा मुंडेसाहेब म्हणायचे, एक काळ असा येईल, जिथे आपल्याला अस्त्रांची, शस्त्रांची किंवा बॉम्ब-गोळ्यांची गरज लागणार नाही. आपली युवा पिढी बरबाद करण्यासाठी व्यसनांची व्यवस्था केली जाईल. तुम्ही व्यसनाधिन झालात तर तुम्हाला कोणतीच ताई वाचवू शकणार नाही, हे व्यसन तरुण पिढीला खाऊन टाकतंय. याला कुणीही जबाबदार असो, त्याला बेड्या ठोका आणि तरुणाईला यापासून वाचवा,” अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली.