नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिला. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरी अधिक उजवी ठरली. पक्षाने १० पैकी ८ जागा जिंकत इतर पक्षांपेक्षा चांगला स्ट्राईक रेट असल्याचे दाखवून दिले. ४ जूनच्या निकालानंतर १० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मात्र वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या भाषणातून आता श्रेयवादाचे राजकारण होत असल्याचे समोर आले आहे. तसेच पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात गट पडल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे.

राष्ट्रवादीच्या चांगल्या कामगिरीनंतर पक्षाच्या मुख्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटील ‘किंगमेकर’ ठरल्याचे बॅनर लावले. या बॅनरवरून पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. १० जून रोजी अहमदनगर येथे पक्षाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विजयाचे श्रेय हे शरद पवार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीचं फळ असल्याचं सांगितलं. रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले, “पुढील काळात कुणी स्वतःला किंगमेकर म्हणवून घेईल. पण हा विजय कुणा एका नेत्यामुळे झालेला नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला घवघवीत यश मिळालं. तसेच शरद पवार यांनी या वयात ज्या तडफेने प्रचार केला, त्याचेही आपल्याला कौतुक करावे लागेल.”

“अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली”, संघाच्या मुखपत्रातून टीका

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ६ जून रोजी एक्सवर एक पोस्ट टाकून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. या मागणीचे निश्चित कारण काय? याबद्दल त्यांनी कोणतेही सुतोवाच केले नव्हते. या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यावर रिप्लाय देत, हे माझे वैयक्तिक मत असल्याचा खुलासा केला.

विकास लंवाडे यांच्या पोस्टनंतर पक्षाचे तरूण प्रवक्ते आणि जयंत पाटील यांच्याशी जवळीक असलेल्या ॲड. भूषण राऊत यांनीही एक पोस्ट टाकून प्रदेशाध्यक्षपदावर दावा करणाऱ्यांना टोला लगावला. “राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्प नाहीये…”, असा खरमरीत टोला भूषण राऊत यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धुसफूस असल्याचे चित्र समोर आले आहे.

राष्ट्रवादीच्या दोन प्रवक्त्यांमध्ये सुरू असलेल्या या सोशल मीडिया द्वंदानंतर अजित पवार गटाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

अजित पवार गटाचे युवा नेते आशिष मेटे यांनी एक्सवर पोस्ट टाकून शरद पवार गटाला टोला लगावला. “भुषण हे जयंत पाटील साहेबांचे एकदम जवळचे व्यक्ती आणि सोबत पक्षाचे प्रवक्ते पण आहे.पक्षात सारं काही आलबेल नाही हे पक्षाच्या प्रवक्ताच्या एका ट्विटने जगासमोर आले आहे.जयंत पाटील-रोहित पवार ह्या संघर्षात आता प्रवक्ते पक्षाची अधिकृत भुमिका मांडुन हा वाद आहे हेच अधोरेखित करत आहेत”, अशी टीका आशिष मेटे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चुकत असेल तर कानात सांगा, जाहीररित्या बोलणे टाळा – जयंत पाटील

पक्षातील अंतर्गत दुफळीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्धापनदिनी भाष्य केले होते. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून येणे, हे टीम वर्क आहे. आपल्याला टीम म्हणूनच राहिले पाहिजे. त्यामुळे चुक होत असेल तर कानात सांगा, जाहीररीत्या सांगू नका”, असे म्हणत त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.