मागील काही महिन्यांपासून तत्कालीन महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासाठी लढा देत आहे. आता राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकार अस्तित्वात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासंबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. ओबीसी आरक्षणासंबंधी महाविकास आघाडीने केलेल्या कामाचा आढावा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय’ असं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ओबीसी आरक्षणासंबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या आठ-दहा महिन्यांपासून आम्ही ओबीसी आरक्षणाची लढाई लढत आहोत. कित्येक वेळा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं. सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे विकास गवळी विरोध करत होते. तेथूनच खरंतर ओबीसीच्या आरक्षणाला देशभरात ग्रहण लागलं. कारण ते महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणायला गेले. पण त्यानंतर न्यायालयाचा निकाल सर्व राज्यांना लागू झाल्याने मध्य प्रदेशापासून सर्व राज्य सरकारं अडचणीत आली.”

दरम्यान, आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला. प्रत्येक गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टात जाऊ नका, तुम्ही या, तुम्हाला जसा पाहिजे त्याप्रमाणे रिपोर्ट तयार करून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा, अशी विनंती आम्ही बावनकुळे यांच्याकडे केली. तुम्हीही ओबीसी आरक्षणाबाबत चांगलं बोलता, आम्हीही ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करतोय, असं सांगितल्यानंतर गवळी शांत झाले. पण गवळी शांत होताच भाजपाचे राहूल वाघ न्यायालयात गेले.

न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आम्ही दुसरा भाटिया आयोग नेमला. त्यांनी चांगलं काम सुरू केलं. या आयोगानं महाविकास आघाडीकडे मदत मागितली. मध्यप्रदेशाकडे जी आकडेवारी आहे, त्याप्रमाणे आकडेवारी गोळा करून द्या, अशी विनंती त्यांनी केली. त्यानुसार आम्ही सर्व आकडेवारी गोळा करून त्यांना दिली. पण ती आकडेवारी १०० टक्के बरोबर असेलच असं नाही, कारण ती आकडेवारी मतदार यादीवरून तयार करण्यात आली आहे. हा डेटा ८-१० दिवसांपूर्वी भाटिया आयोगाकडे सादर केला आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामध्ये लक्ष घालत आहेत, याचा आनंद आहे, असं म्हणाले. दरम्यान ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ असा उच्चार करताना ते काहीसे अडखळले, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं काहीसं जड जातंय” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is difficult to call devendra fadnavis deputy chief minister statement of chhagan bhujbal while talking about obc reservation rmm
First published on: 04-07-2022 at 08:37 IST