Chhava Sanghatana-NCP Clash: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. सुनील तटकरे यांची लातूरमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन द्यायला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. त्यानंतर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेनंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
दरम्यान, या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे म्हणाले की, “जो प्रकार घडला, तो चुकीचा आहे. मी याचे कधीच समर्थन करणार नाही. मी अत्यंत शांत कार्यकर्ता आहे. चर्चेतून, देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न सुटत असतात. ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले होते. मी ते शांतपणे ऐकून घेतले.”
“मी याचे कधीच समर्थन करणार नाही. आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टीचे समर्थन केले नाही. ही घटना माझ्यासमोर घडली नाही. तुम्ही दाखवा की मी तिथे होतो. मी लातूर शहरातील विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींशी चर्चा करत होतो. मी या गोष्टीची, जी चूक घडली, त्याची स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करतो.”
काय आहे प्रकरण?
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कोकाटे मोबाईलमध्ये पत्ते खेळत असल्याचे दिसत आहे. यावरून त्यांच्यावर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. अशात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना दिले.
निवेदन देताना छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणही मारहाण करत असल्याचे दिसत आहेत.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन देताना छावा संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, “त्यांना हे पत्ते द्यावे आणि घरी बसून खेळायला सांगावे. विधानभवन हे शेतकरी, कष्टकरी आणि राज्यातील जनतेसाठी कायदे करण्यासाठीचे सभागृह आहे. तिथे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. ती पत्ते खेळण्याची जागा नाही. ते तुमच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांना तुम्ही मंत्री केले आहे. अशा मंत्र्यांना पदावर ठेऊ नका, यामुळे तुमच्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे.”