सोलापूर : मुंबईत विलेपार्ले येथे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिकेने बेकायदा ठरवून पाडल्याच्या निषेधार्थ सोलापुरात सकल जैन समाजातर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अकलूजमध्येही जैन समाजाने आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला. मुंबईत विलेपार्ले येथे जैन मंदिर पाडण्याच्या घटनेसह जैन तीर्थक्षेत्र श्री सम्मेदशिखरजी, श्री पालीताणा श्री गिरनारजी आदी ठिकाणी होणारे हल्ले, जैन धर्मगुरू, साधू, साध्वींवर होणारे हल्ले वाढत आहेत. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातही नुकतीच जैन मंदिराची मोडतोड झाली आहे. या घटनांच्या निषेधार्थ सकल जैन समाजातर्फे बाळीवेशीतील श्री गांधी नाथा रंगजी जैनमंगल प्रतिष्ठान येथून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा विविध मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.

या मोर्चेकऱ्यांनी हातात काळी पट्टी आणि दंडाला काळी रिबन बांधली होती. काळे झेंडे, जैन धर्माचे ध्वज, घोषणांचे फलक घेऊन निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जैन समाज बांधवांसह विविध सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांचे नेते सहभागी झाले होते. श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुनील गांधी, पद्म राका, कैलास कोठारी, केतन शहा, श्याम पाटील, अनिल जमगे, सूर्यकांत शहा, सुहास शहा, सुजाता संगवे, डॉ. सुजाता मेहता, पल्लवी मेहता, सोनाली पालिया, संजीव पाटील तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी आदींचा या मोर्चात सहभाग होता. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

(अकलूजमध्ये मोर्चा)

विलेपार्ले येथे मुंबई महापालिकेने जैन मंदिर काढून टाकण्याच्या निषेधार्थ अकलूजमध्ये सकल जैन समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अकलूज शांतता व समन्वय समितीचे कार्याध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जैन स्त्री-पुरुषांचा या मोर्चात सहभाग होता. हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. प्रांताधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केले.