टंचाईमुळे शुष्क होत चाललेल्या भारतीय शेतीस संजीवनी देणारे येथील जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल हिरालाल जैन (७०) यांचे गुरूवारी दुपारी चार वाजता मुंबई येथे निधन झाले. जैन यांच्यावर काही दिवसांपासून मुंबईत उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी तीन वाजता जैन हिल्स येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कृषिविषयक आणि सामाजिक कार्यामुळे लाखोंचा पोशिंदा झालेले भवरलाल जैन यांनी ‘भाऊ’ म्हणून ओळख निर्माण केली होती. जिल्ह्य़ातील वाकोद या छोटय़ाशा गावात १२ डिसेंबर १९३७ रोजी जन्म झालेले जैन हे वाणिज्य आणि विधि शाखेचे पदवीधर होते. प्रशासनातील नोकरी चालून आली असताना तिला नकार देत स्वतंत्र उद्योगाच्या उभारणीला त्यांनी प्राधान्य दिले. १९६२ ते १९७८ या कालावधीत जैन यांनी खते, बी-बियाणे, ट्रॅक्टर आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पंपांसाठी हलकं डिझेल तेल, अशा प्रकारच्या शेतीशी संबंधित वस्तू वितरणाचे काम केले. १९७८ मध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश अशा लगतच्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांना करार तत्वावर पपईची शेती करण्यास प्रवृत्त केले. पपईच्या दुधापासून तयार केलेल्या ‘पपेन’ ची २००२ पर्यंत सातत्याने १०० टक्के निर्यात केली. पुढे त्यांनी शेतीमधील सिंचनासाठी पीव्हीसी पाईप बनविण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांना विक्रीपश्चातही सेवा देण्याच्या त्यांच्या शैलीने हे पाईप प्रचंड लोकप्रिय झाले. त्यानंतर १९८८ मध्ये जैन इरिगेशनने ठिबक व तुषार सिंचनात पदार्पण करून अल्पावधीत संपूर्ण बाजारपेठ व्यापली. यंत्र व तंत्र थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविणाऱ्या जैन यांचा जळगाव येथील प्रकल्प शेतकरी तसेच कृषितज्ज्ञांसाठी ‘पंढरी’ ठरला. जैन इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन असे समीकरणच रूढ झाले. जैन उद्योग समुहाचा मग जैन हायटेक अ‍ॅग्री इन्स्टिटय़ुट, केळी ऊती संवर्धन प्रयोगशाळा, जैन उच्च तंत्र शेती संस्थान असा विस्तार होत गेला. ‘ग्रँडनैन’ या नावांची उती संवर्धित केली रोपांची नवी जात व्यापारी तत्वावर वितरित करण्याचा पहिला मान भवरालाल जैन यांच्याकडे जातो. शेतमालावर संशोधन विकास व प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि विस्तार केंद्र, पडित जमिनीचा विकास, नापिक जमीन लागवडीखाली आणणे, मृदसंधारण, डोंगराळ व खडकाळ जमिनीवर लागवड, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, जलसंधारणाचे व्यवस्थापन, खतपाणी, हरितगृहे व त्याचबरोबर सेंद्रिय आणि जैव खते तसेच जैव-किटकनाशके हे सर्व जैन यांनी ‘जैन हिल्स’ येथे एका छताखाली आणले. जैन यांच्या उद्योगांचा सर्व डोलारा कृषिवर आधारित राहिला. त्यावर मग पुरस्कारांचे इमले चढत गेले. २००८ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले. ‘ती आणि मी’ यांसह इतर अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. जैन यांच्या पश्चात अशोक, अनिल, अजित, अतुल हे चार मुलगे आणि सूना, नातवंडे असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jain irrigation founder bhavarlal jain passes away
First published on: 26-02-2016 at 00:02 IST