जळगावमधील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मराठा समाजाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. बकाले यांना निलंबित करण्याचे आदेश रात्रीच्या सुमारास निघाले असून याबाबतची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिली. तसेच या प्रकरणावरुन इशारा देणाऱ्यांनाही मुंढे यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते असं कोणतेही कार्य करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं आहे.
“पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे १ नोव्हेंबर २०२० पासून जळगावमधील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यकरत आहेत. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणुकीत असलेल्या एका पोलीस अंमलदारासोबत विशिष्ट समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्ह, घृणास्पद, निंदनीय आणि विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना, उच्च नैतिक मुल्यं बाळगून, लोकांप्रती सौजन्य आणि सद्वर्तन ठेवणे अपेक्षीत होते. असं असतानाही त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल अथ्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापरक केला आहे. व्हायरल ऑडीओ क्लीपमधील संभाषणामुळे विशिष्ट समाजात चुकीचा संदेश जाऊन पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदारपणाच्या गैरवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रस्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,” असं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ, बी. जी. शेखर पाटील यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
बकाले यांच्या बेजबाबदार वर्तवणुकीची सखोर प्रथामिक चौकसी करुन, आवश्यक जबाब व दस्तऐवजी पुरावे जमा करावेत आणि त्याबाबतचा अहवाल २२ सप्टेंबरपर्यंत सादर करावा असे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशांनंतर बकालेंचं निलंबन करण्यात आलेलं आहे.

“मराठा समाजाविषय आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बकाले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे,” असं मुंढे यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. बकालेविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी खात्याने डिपार्मेंटल इन्कायरी सुरु करण्यात आली आहे. ही चौकशी आयपीएस अधिकार, जळगावचे सहाय्यक पोलीस अधिकक्षकांकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दल अशा जातीवाचक किंवा द्वेषपूर्ण विधान करणाऱ्या व्यक्तीला कधीही पाठिशी घालणार नाही, असंही मुंढे यांनी म्हटलं आहे.
मी आव्हान करु इच्छितो की एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याची कायदा, सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही कृती करु नये. पोलीस दलाला सहकार्य करावे, असंही मुंढेंनी म्हटलं आहे.
बकाले काय म्हणाले होते?
काही आरोपींसंदर्भात पोलीस अंमलदारासोबत फोनवर बोलताना बकाले यांनी मराठा समाजाचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधानं केली होती. याचसंदर्भातील व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने जळगावमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांनी बकालेंना निलंबित करण्याची मागणी केली होती. संभाजीराजे छत्रपती यांनीही ट्वीटरवरुन बकालेंना निलंबित करावे अशी मागणी केली होती.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनीही बकालेंवर टीका केली होती. “आपल्या पोलीस कर्मचारी सोबत संभाषण करतांना काय बकुन गेले हे त्यांनाच कळले नाही. एखाद्या समाजा विषयी वाईट विचार मनात ठेवून त्या व्यक्त करणे हे निषेधार्थ आहे. अशा अधिकारी ला तात्काळ निलंबित करण्यात यावे,” असं सोमवंशी म्हणाले होते.