जालना : चार लाख लोकसंख्येच्या जालना शहरात दहा हजाराहून अधिक भटकी कुत्री असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे जालना शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भटकी कुत्री झुंडीने फिरत असून ती कधी कुणावर हल्ला करतील याचा नेम नाही. स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या एका स्वच्छता निरीक्षकावरच भरदुपारी रेल्वे स्थानकाकडून उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. आसपासचे लोक धावल्याने तो बचावला. मागील पाच महिन्यांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरात दोन बालिकांचा मृत्यू झाला.
सप्टेंबरमध्ये यशवंतनगर भागात कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षांची बालिका मृत्युमुखी पडली. तर गेल्या मे महिन्यात गांधीनगर भागात सहा-सात वर्षे वयाच्या बालिकेचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याआधी नॅशनल नगर भागात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका बालकावर शंभरपेक्षा अधिक टाके पडले होते. सुदैवाने उपचारांनंतर तो त्यामधून बचावला होता.
महानगरपालिकेतील सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना जालना शहरात सुमारे दहा हजार भटकी कुत्री असल्याचा अंदाज व्यक्त केला. मागील वर्षभरात कुत्र्यांनी किती जणांना चावा घेतला याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत असून त्यानंतर त्यांना चार दिवस स्वतंत्र ठिकाणी ठेवले जाते. सध्या असे एक केंद्र शहरात असून दुसरे भोकरदन नाका भागात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात वेळोवेळी आवाज उठविणारे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले की, गेली अनेक महिने संपूर्ण शहर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २५ या वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हयातील शहरी भागात २ हजार ९४७ जणांना तर ग्रामीण भागात १ हजार ४०३ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. शहरी भागातील संख्या ही फक्त जालना शहरातील नसून अन्य तालुक्यांच्या ठिकाणांची मिळून आहे. याशिवाय या वर्षभरात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जिल्हयातील आंतररुग्णांची संख्या २ हजार १३१ एवढी आहे.
मागील वर्ष-दीड वर्षात जालना शहरात भटक्या कुत्र्यांनी मांडलेला उच्छाद चिंताजनक आहे. वेळोवेळी या संदर्भात महानगरपालिकेवर आंदोलने करूनही भटक्या कुत्र्यांची भीती कमी झालेली नाही. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांची संख्या नियंत्रित करणे आणि लसीकरण करण्यासाठी याआधी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने महानगरपालिकेस पूर्वकल्पना न देताच काम बंद केले होते. नंतर नवीन कंत्राट देण्यात आले. एकीकडे उपाययोजनांचा हा घोळ चालू असून दुसरीकडे भटक्या कुत्र्यांची जालना शहरातील समस्या मात्र कायम आहे.
ॲड. महेश धन्नावत यांनी यासंदर्भात सांगितले की, भटक्या कुत्र्यांमुळे जालना शहरात निर्माण झालेली भीती आणि असुरक्षिततेच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक नागरिकांनी चार-पाच दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. काही नागरिकांनी यासंदर्भात मोर्चाही काढला होता. चोवीस तास शहरातील सर्वच भागांत भटक्या कुत्र्यांची भीती असून महानगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
