जालना – जालना शहरात सोमवारी रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जालना शहरातील अनेक भागांत घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. शहरातील अनेक वस्त्यांना तलावाचे खरूप आले तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. रात्रभरात जालना शहरात ८१.५ मि. मी तर जालना तालुक्याच्या ग्रामीण भागात ८९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

शह‌रातील लालबाग भागात पावसामुळे अडकलेल्या १२ व्यक्तींची तर टांगा स्टॅण्ड भागात घरात अडकलेल्या एका महिलेची अग्निशमन विभागाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. नीलम चित्रपटगृहाच्या बाजू‌ने जाणाऱ्या नाल्याचे पाणी अनेक घरांत घुसले. रेल्वेस्थानक रस्त्यावरील अनेक दुकाने आणि उपहारगृह जलमय झाले. सुखशांतीनगर, त्रिमूर्तीनगर, सिंदखेड राजा वळण रस्ता, साठेनगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

अनेक झोपड्यांतील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मंठा रस्त्यावरील चौधरी नगर परिसर त्याचप्रमाणे भाग्यनगर भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांनी सकाळीच जालना शहरातील लालबाग, लक्कडकोट यासह अन्य भागांची पाहणी करून महानगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या. शहरातील सीना आणि कुंडलिका नद्यांनाही मोठे पाणी आले होते.

मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्हयात सरासरी ४८.८ मि. मी. पाऊस झाला.  जालना शहर, जालना ग्रामीण, सेवली, रामनगर, पाचन वडगाव, वरूड, परतूर, अंबड, गोंदी, वडिगोद्री, सुखापुरी, तीर्थपुरी, अंतरवाली, कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ या पंधरा मह‌सूल मंडलांत अतिवृष्टी झाली.

जोरदार पावसामुळे जिल्ह‌यातील जीवरेखा, उर्ध्व दूधना आणि गल्हाटी हे मध्यम सिंचन प्रकल्प भरून वाहात आहेत. ५८ पैकी ३१ लघुसिंचन प्रकल्प भरुन वाहात आहेत. वीज पडल्याने बरंजळा साबळे (तालुका भोकरदन) गावातील समाधान बाबूराव साबळे यांचा मृत्यू झाला. तर घनसावंगी तालुक्यातील श्रीकृष्णनगर येथील बाबु तुळशीराम चव्हाण वीज पडून जखमी झाला. जालना तालुक्यातील खणेपुरी येथे वीज पडून एक बैल ठार झाला. तर घनसावंगी तालुक्यातील दैठणा खुर्द आणि उक्कडगाव येथे वीज पडल्याने दोन म्हशी मृत्युमुखी पडल्या. पावसामुळे जिल्हयाच्या अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत.