जालना : दुचाकीचे आणि त्यातही बुलेटचे मूळ सायलेन्सर काढून त्या जागी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून सार्वजनिक शांतता भंग करणारांच्या विरोधात जालना पोलिसांनी मोहीम उघडली आहे.
या मोहीमेच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी अशा साठपेक्षा अधिक दुचाकी पकडल्या. प्रामुख्याने बुलेट गाड्यांच्या विरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली. यापुढेही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याने पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जालना शहरातील चौकाचौकांत मूळ सायलेन्सर बदलणाऱ्या बुलेटची तपासणी केली आणि ६२ वाहने वाहतूक शाखेच्या परिसरात जमा केली. तेथे कर्णकर्कश आवाज करणारे बदललेले सायलेन्सर काढून टाकण्यात आले. जप्त करण्यात आलेले सायलेन्सर नष्ट करण्यात येणार असल्याचे जालना शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी या संदर्भात माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, शहरातील दुचाकी वाहनांच्या कर्णकर्कश सायलेन्सर बाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांनीही यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांच्या तपासणीसाठी सोमवारी विशेष मोहीम घेण्यात आली. शहर वाहतूक शाखा त्याचप्रमाणे सदर बाजार, कदीम जालना आणि तालुका जालना पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या या मोहीमेत ७ पोलीस अधिकारी आणि ४० कर्मचारी सहभागी झाले होते.
कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर विक्री करणारे दुकानदार आणि ते बसवून देणाऱ्या गॅरेज मालकांची यासंदर्भात इशारा देणारी बैठक शहर वाहतूक शाखा घेणार आहे. त्यानंतरही फरक पडला नारी तर त्यांच्या विरुध्दही कारवाई करण्यात येणार आहे. कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकींची छायाचित्रे नागरिकांनी पाठविली तर शहानिशा करून कारवाई केली जाईल. जालना शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे काम येत्या पंधरा ऑगस्टपर्यन्त पूर्ण होणार आहे. त्यातील चित्रिकरणाची पाहणी नियंत्रण कक्षात केली जाणार आहे. त्यामध्ये अशी दुचाकी वाहने दिसून आली तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल