Jayant Patil NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची बातमी आज सकाळी वृत्तवाहिन्यांनी दाखवली. तसेच आमदार शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदग्रहण करणार असल्याचीही बातमी दाखविण्यात आली. खुद्द शशिकांत शिंदे यांनी काही वृत्तवाहिन्यांशी संवाद साधत मंगळवारी (१५ जुलै) यावर निर्णय होणार असल्याचे सांगितले. मात्र आता पक्षाचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत अद्याप जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्षपदी असल्याचे स्पष्ट केले. तसेच खोडसाळ बातम्या माध्यमात पसरविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांना पक्षात येण्याची ऑफरही देण्यात आली.
वृत्तवाहिन्यांनी जयंत पाटील यांच्या नाराजीच्या बातम्या चालविल्यांतर जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले. “जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो.”
जितेंद्र आव्हाड यांच्या व्यतिरिक्त शरद पवार गटातून रोहित पवार यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. ईडीच्या आरोपपत्रात नाव दाखल झाल्याची माहिती बाहेर आल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी त्यांना जयंत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या स्तरावर बैठक झाली असून त्यातील निर्णय लवकरच जाहीर होईल.
दरम्यान जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याचे वृत्त पसरताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी भुवया उंचावणारे विधान केले. ते म्हणाले, जयंत पाटील हे अनेक वर्षांपासून पक्षात अस्वस्थ आहेत, असे बोलले जात होते. आज त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षात प्रवेश केला तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करतील.
जयंत पाटील विचार सोडून जाणार नाहीत – रोहित पवार
दरम्यान जयंत पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असताना रोहित पवार यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, “जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत. राजीनामा दिला म्हणून ते पक्ष सोडून जातील, ही शक्यता वाटत नाही. सत्तेसाठी ते आजवर ज्या विचारांशी प्रामाणिक राहिले, ते विचार ते सोडणार नाहीत. एखादे मंत्रिपद मिळावे म्हणून ते पवार साहेबांना किंवा विचारांना सोडून पळून जातील, असे मला वाटत नाही.”
मला पक्षसंघटनेत संधी हवी – रोहित पवार
नवे प्रदेशाध्यक्ष कोण असणार आहेत, याची मला माहिती नाही. १५ जुलै रोजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करतील, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान मलाही पक्ष संघटनेत पद हवे असून मला काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छाही रोहित पवार यांनी बोलून दाखवली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष नाही पण इतर पद मिळाले, तर मी पक्ष संघटनेसाठी आणखी चांगले काम करू शकतो.”