राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला. तसेच महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल शिंदे-फडणवीस माफी मागतील का? असा प्रश्न विचारला.

जयंत पाटील म्हणाले, “गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?”

“वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे,” असा आरोप जयंत पाटलांनी केला.

हेही वाचा : ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’, एकनाथ शिंदेंची जयंत पाटलांवर टोलेबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती,” असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.