Devendra Fadnavis On Jayant Patil : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० जुलै रोजी झालेल्या एका पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराच्या चर्चांवर आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्या पक्षप्रवेशासाठी त्यांना कोणी अर्ज केला होता का?’, असं मिश्कील वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
“आता सत्तेत जाण्याची नवीन पद्धत सुरू झालेली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की राज्य चालवण्याला त्यांनी जास्त महत्व द्यावं. कारण सत्तेत २३८ आमदार आलेले आहेत, त्यामुळे आता आणखी काही अपेक्षा करण्याची गरज नाही. माझ्या पक्षप्रवेशासाठी त्यांना कोणी अर्ज केला होता का? पण पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यामुळे त्यावर त्यांना उत्तर देणं आवश्यक आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर ते तरी काय बोलणार?”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?
सांगलीमधून आणखी काही पक्ष प्रवेश होतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारला होता. या प्रश्नांवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे, तो प्रवेश सध्या तरी आमच्या मनामध्ये नाही”, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आज जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.