Maharashtra Monsoon Session 2023 : राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात आज मान्यता दिल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात निवेदन देत त्यांचं अभिनंदन केलं. तसंच, विरोधी पक्षनेता आणि सत्ताधाऱ्यांमधील संबंध कसे असायला हवेत, याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी अनेक किस्से आज सभागृहात सांगितले. यावेळी गोपिनाथ मुंडे यांच्यापासून नारायण राणेंचाही उल्लेख जयंत पाटलांनी केला.
“राजकीय संस्कृतीत काही बदल मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आहेत. या सगळ्यातून मार्ग काढून विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची जबाबदारी वडेट्टीवारांवर सोपवली आहे. अनेक प्रश्नांना सभागृहात वाचा फोडण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षनेता म्हणून अनेकांनी या खूर्चीला न्याय दिला आहे हे मी ३५ वर्षे पाहिलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
नारायण राणेंनी नुसतं वळून पाहिलं तरी
“नारायण राणे असे विरोधी पक्षनेते होते की त्यांनी इकडे डावीकडे पाहिलं तरी सगळे सैनिक खाली बसायचे. इतका त्यांचा प्रभाव आणि दरारा होता. हात करायलाही लागायचा नाही. त्यांनी नुसतं वळून पाहिलं तरी विरोधी पक्षातील आमदार अर्ध्या सेकंदात खाली बसायचे. सभागृहात इथे बसून त्यांनी अनेक भाषणं केली. मी अर्थमंत्री होतो, प्रत्येक संकल्पावेळी त्यांचा अभ्यास असायचा. त्यांचं भाषण इतकं उत्कृष्ट असायचं की त्यावेळी सभागृहात वाटायचं की काय जयंत पाटलांनी किती चुकीचा अर्थसंकल्प माडंला, इतकं प्रभुत्व त्याचं होतं. विरोधी पक्षाचा आणि सत्तारुढ पक्षाचा संबंध सौदार्यपूर्ण असलं पाहिजे”, असंही जयंत पाटील म्हणाले.
नारायण राणेंनी माझ्यासाठी कोट शिवला
“मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो, त्याचदिवशी क्रिकेटची मॅच चार वाजता होती. मी विधानसभा अध्यक्षांना विनंती केली की मला अर्थसंकल्प दोन-तीन वाजता मांडायला पाहिजे, कारण मॅच सुरू झाली की कोणी अर्थसंकल्प पाहणार नाही. तेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणाले की विरोधी पक्षनेत्यांशी बोलून चर्चा करावी लागेल. विरोधी पक्षनेते नारायण राणे होते. ते म्हणाले ते जाऊदे सगळं. पण उद्या काय घालणार आहेस ते सांग? मी म्हणालो नेहमीचंच शर्ट पॅन्ट. तर म्हणाले की नाही, महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटा आणि बुटातच आला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या दालनात आलो. तर तिथे टेलर हजर. मी माप देणार नाही असं त्यांना म्हटलं. तर बळजबरीने ते माप घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प मांडला तो नारायण साहेबांनी दिलेला कोट घालून मांडला. अशा पद्धतीने विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा संबंध मधुर असला पाहिजे”, अशी आठवण जयंत पाटलांनी आज सभागृहात सांगितली.
माझ्याविरोधात भाषण करायचे आणि माझ्याकडेच येऊन चहा प्यायचे
“गोपीनाथ मुंडेही इथेच बसायचे आणि एकदम जोरात भाषण करायचे आणि मग माझ्याच दालनात येऊ म्हणायचे जयंत चहा दे. माझ्याचविरोधात भाषण करायचे आणि माझ्याकडे येऊन चहा प्यायचे. विरोधी पक्ष आणि सत्तारुढ पक्ष यांच्यातील संबंध सभागृहाबाहेर सौदार्य पाहिजे. कितीही जोरात अंगावर गेलो तरी तो आवेश प्रश्नापुरताच आहे हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं”, असंही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा >> “बारामती शेजारील मतदारसंघातही उभं राहायचं धाडस नाही”, अजित पवारांनी विधानसभेत दिली कबुली, म्हणाले…
विरोधी पक्षनेत्याच्या खूर्चीची पूजा केली पाहिजे
“माझ्या मनात विचार आला की ती जी खुर्ची आहे, मी शिंदेंना विचारणार होतो पण वेळ मिळाला नाही. पण तिथे खूर्चीची पूजा केली पाहिजे. पंचमहाभूताची पूजा किंवा खुर्चीची पूजा केली पाहिजे. मलाही बसायचं होतं तिथे. पण भूजबळ म्हणाले जयंत तू थांब रे तू पक्ष बघ आणि दादा विरोधी पक्षनेते होतील. नशिब कसं असतं बघा, जो या खुर्चीवर (विरोधी पक्षनेत्याच्या) बसतो तो त्या खुर्चीवर (उपमुख्यमंत्री पदी) जाऊन बसतो. मी शिंदेंनाच विचारणार आहे की कोणती पूजा केली पाहिजे तिथे की बसलेला माणूस पूर्ण टर्म तिथेच बसला पाहिजे”, अशी मिश्किल टिप्पणीही जयंत पाटलांनी सभागृहात केली.
हा तर शुभशकून
मागच्या वेळेला विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते होते. ते विरोधी पक्षनेते झाल्यावर चार महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. हा एक शुभशकून आहे. त्यामुळे मला खात्री आहे की या भागातील (विरोधी बाकावरील) लोक सत्तेच्या (सत्ताधारी बाकावर) बाजूला जातील. पाय कोणाचा हे देखील महत्त्वाचा भाग असतो.