साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामध्ये रविवारी सनई-चौघड्याच्या निनादात चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात आला. १५ ते २० डिसेंबर पर्यंत गडामधील नवरात्र महालामध्ये खंडोबाचे घट बसवण्यात आले होते. या सहा दिवसाच्या काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने ऎतिहासिक गड उजळला होता तर मुख्य मंदिर व देवाचा गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता. आज पहाटे स्थानिक मानकरी-ग्रामस्थांच्या पूजा व अभिषेक झाले. त्यानंतर देवाचे घट उठवण्यात आले.हजारो भाविकांनी आज गडावर देवाचे दर्शन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी रात्री जेजुरी गावातून प्रथेप्रमाणे तेल हंड्याची मिरवणूक काढण्यात आली. या हंड्यात ग्रामस्थांनी तेल ओतले. सनई-ढोल वाजवीत हा तेल हंडा खंडोबा गडावर नेण्यात आला. रात्री देवाला या तेलाचे तेलवण करुन हळद लावण्यात आली. पौष पोर्णिमेला खंडोबा-म्हाळसादेवीचा विवाह पाली (जि.सातारा) येथे केला जातो. या लग्नाची हळद जेजुरी गडावर खंडोबाला लावली जाते. या निमित्त गडावर फराळाचा रुखवतही मांडण्यात आला होता.चंपाषष्ठी निमित्त भाविकांनी खंडोबाला श्रद्धापूर्वक वांग्याचे भरीत, रोडगा, पुरणपोळी, कांद्याची पात आदी नैवेद्य अर्पण केले. साऱ्या महाराष्ट्रात आज घराघरात बसविलेले खंडोबाचे घट उठवण्यात आले. तळी-आरती करुन देवाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jejuri maharashtra champashashthi utsav celebrated jud
First published on: 20-12-2020 at 20:45 IST