बुधवारी गुढीपाडवा हा मराठी माणसाचा आनंदाचा दिवस आहे. मराठी माणूस नव्या वर्षाची सुरूवात या दिवसापासून करतो. हा आनंदाचा दिवस मुंबईसाठी मात्र दुःखाचा आहे कारण मुंबईला मॅनचेस्टर ऑफ इंडिया म्हटलं जात होतं. मुंबईचं हे ऐतिहासिक महत्त्व होतं. टेक्स्टाईलमध्ये अग्रगण्य असलेली मुंबई होती. त्यामुळे १९४३ मध्ये वस्त्रोद्योग आयुक्तालय स्थापन करण्यात आलं होतं. ते आयुक्तालय आता दिल्लीला नेलं जातं आहे. याचा अर्थ मुंबईला हळूहळू कमकुवत करण्याचा डाव केंद्र सरकार करतं आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.

केंद्र सरकारने मुंबईतलं वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९४३ मध्ये हे आयुक्तालय मुंबईत स्थापन कऱण्यात आलं होतं. आता दिल्लीला हलवण्यात येत असल्याने जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली आहे.

काय काय म्हटलं आहे आव्हाड यांनी?

गेल्या ८ ते ९ वर्षांमध्ये अनेक कार्यालयं आणि अनेक उद्योग हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यात आले. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आहे. महाराष्ट्र्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम केंद्र सरकारकडून सातत्याने केलं जातं आहे असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मराठी माणसाचा स्वाभिमान चिरडण्याचं काम केंद्राकडून सुरू झालं आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. आता केंद्र सरकारने मुंबईतलं टेक्सटाईल आयुक्तांचं कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी आता केंद्र सरकारवर टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांचीही टीका

१९४३ पासून मुंबईत असणारं वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवण्यात येतं आहे. महाराष्ट्राबद्दल पूर्वापार असलेला आकस हा मोदी सरकारच्या कृतीतून समोर उतरला आहे. मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत असाही आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.