मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं आणि उपोषणं करून राज्य सरकारला जंग जंग पछाडलं. अखेर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्यासाठी लाखो मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली. मराठ्यांची ही पदयात्रा मुंबईच्या वेशीवर (वाशी, नवी मुंबई) पोहोचल्यावर राज्य सरकारने तातडीने मराठा आंदोलकांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यानुसार ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे. तसेच कुणबी जातप्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र दिलं जाईल, याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

राज्यभरातले अनेक ओबीसी नेते राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांची मागणी योग्य असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच तुम्ही सरकारमधून बाहेर पडून तुमची मागणी लावून धरा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असंही आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.

शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे. परंतु, मराठा सामाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ही आमची भूमिका आहे. आम्ही आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांनाही तेच सांगितलं आहे. आपण सगळे बहुजन आहोत. बहुजनांमध्ये भांडणं लावून, कोंबडे झुंजवत ठेवून सत्ता लाटण्याचा प्रयत्न काही जणांकडून चालू आहे.

हे ही वाचा >> “राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतायत”, ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले, “त्यांना पैसे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मराठा आंदोलकांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने जो अध्यादेश काढला आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कुणबी प्रमाणपत्र असलेल्या लोकांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्या. मग माझ्या नातेवाईकांना माझी जात लागणार का? माझी बायको ब्राह्मण आहे. तिच्या बहिणीला तुम्ही वंजारी म्हणून प्रमाणपत्र देणार का? आम्ही सगेसोयरे आहोत, त्यामुळे माझ्या बायकोच्या बहिणीच्या (मेहुणी) मुलांना वंजारी जात लावणार का? आम्ही सगेसोयरे आहोत. आमचं रक्ताचं नातं आहे म्हटल्यावर त्यांना ही जात लावता आली पाहिजे.