Jitendra Awhad says Sanatan Dharma ruined India : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर चव्हाणांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ नव्हे तर ‘सनातनी दहशतवाद’ असं म्हणायला हवं अशी टिप्पणी केली होती. त्यावरून चव्हाण यांच्यावर टीका होऊ लागली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड पृथ्वीराज चव्हाणांबरोबर उभे राहिले आहेत. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं अशी टिप्पणी आव्हाड यांनी केली आहे. तसेच त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे.
जितेंद्र आव्हाज म्हणाले, “होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते. शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते. त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते.”
‘सनातनती दहशतवादा’बाबत जितेंद्र आव्हाडांची रोखठोक भूमिका
शरद पवार गटाचे आमदार म्हणाले, “महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे सनातनी दहशतवादीच होते. छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे, त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. एका वर्गाला शुद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच होते. माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे सनातनी दहशतवादीच होते.आगरकर हे केवळ सनातनी प्रवृत्तीविरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.”
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवणारे आणि ते शिक्षणापासून वंचित कसे राहतील, याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या नि:शस्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे सनातनी दहशतवादीच होते. अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातनी दहशतवादीच होते. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला संपवण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना या समाजात स्थानच नाही. त्या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
…तोवर सनातनती दहशतवाद विसरता येणार नाही : आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्या सनातनी दहशतवादाविरोधात होते, त्या मनुस्मृतीला आपले संविधान मानणारे सनातनी दहशतवादीच होते. या सनातनी दहशतवादानेच भारताला जातीव्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली. अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही.”