शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाहेर लग्न केलेल्या मुली आणि त्यांच्या कुटुंबात संवाद ठेवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर सरकारच्या या निर्णयावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सरकारला वेड लागलं आहे, असं म्हणत या निर्णयावर टीका केली. ते बुधवारी (१४ डिसेंबर) माध्यमांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “या सरकारला वेड लागलं आहे, असं म्हणावं लागेल. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास माहिती असणाऱ्यांना माहिती आहे की, महात्मा फुलेंनी दत्तक घेतलेला मुलगा ब्राम्हण होता. शाहू महाराजांनी आपल्या घरातील पहिलं लग्न धनगर समाजात केलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी पत्नी ब्राम्हण होती.”

“आम्ही सज्ञान आहोत, तर तुम्हाला का विचारायचं?”

“वर्णव्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती जाळल्यानंतर महाराष्ट्रात अनेक आंतरजातीय विवाह झाले. पण, आंतरजातीय विवाह करण्यापूर्वी सरकारला कळवा, ही कोणती पद्धत आहे? का कळवायचं आम्ही सरकारला. आम्ही सज्ञान आहोत, तर तुम्हाला का विचारायचं?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.

“वर्णव्यवस्था पुन्हा आणण्याचा प्रयत्न”

आव्हाड पुढे म्हणाले, “संसार नावाची संस्था आहे, ही मोडकळीस आणायची इच्छा आहे का? आता ब्राम्हणांनी ब्राम्हणांबरोबर, क्षत्रियांनी क्षत्रियांबरोबर, वाण्यांनी वाण्यांबरोबर आणि शुद्रांनी शुद्रांबरोबर, असे करून तुम्ही वर्णव्यवस्था पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहात.”

हेही वाचा : “आमचा उद्देश श्रद्धा वालकरचं…”, आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती नेमल्यानंतर मंत्री लोढांची प्रतिक्रिया

“मंगलप्रभात लोढा यांना महाराष्ट्राची संस्कृती काय माहिती आहे,” असं म्हणत त्यांनी टीका केली.