राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील त्यांच्यावर ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. दरम्यान, नुकतंच दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. तशी घोषणा त्यांनी ट्वीटद्वारे केली आहे. दरम्यान आव्हाडांच्या या निर्णयानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी आव्हाडांवर टीका आहे.
‘जितेंद्र आव्हाड आज तथाकथित अन्यायाविरोधात ओरडत आहेत. अनंत करमुसे यांचे आव्हाड यांच्या पोलीस गुंडांनी अपहरण केले. मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. आव्हाड या प्रकरणी माफी मागणार का? आव्हाड तसेच राष्ट्रवादी गप्प का आहे,’ असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.




जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणते आरोप आहेत?
मागील काही दिवसांपासून आव्हाड वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते. त्यांनतर आव्हाड यांच्याविरोधात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काल कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याबाबत आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यास दाबून काय उभी आहे, बाजूला हो असे म्हणत ढकलले, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.