Jitendra Awhad on Clash with Gopichand Padalkar Workers : विधीमंडळ परिसरात गुरुवारी (१७ जुलै) दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी भिडले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली व कपडे फाडण्यात आले. विधान भवनात कार्यकर्त्यांची हाणामारी होण्याचा हा दुर्मीळच प्रसंग असल्याने गोंधळ उडाला. या घटनेवरून सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. “हे कार्यकर्ते मलाच मारायला तिथे आले होते. याप्रकरणी गुन्हेगारांवर अद्याप कारवाई झालेली नाही व आमच्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडून नेलं आहे”, असं म्हणत आमदार आव्हाड यांनी रात्री उशिरा विधान भवन परिसरात ठिय्या आंदोलन केलं.
जितेंद्र आव्हाडांचं ठिय्या आंदोलन
ठिय्या आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, “विधीमंडळात भोळे नावाचे सचिव आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की सभागृहाचं कामकाज संपलं की आम्ही कार्यकर्त्यांना सोडून देतो. मी विचार केला की, जाऊ दे, वाद वाढवायला नको. सचिवांचं ऐकून मी निघून गेलो. सभागृहाचं कामकाज संपल्यावर मी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबरोबरच सभागृहाबाहेर आलो. काही वेळाने मला फोन आला की कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेत आहेत. हा काय प्रकार आहे. आम्ही काय वेडे आहोत का?”
पाच-पाच जण मारहाण करत होते : आव्हाड
घटनेची माहिती देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला मारायला पाच जण तिथे आले होतं. त्यांना मारायला कोणी सांगितलं होतं त्याचे व्हिडीओ देखील आमच्याकडे आहेत. पाच-पाच जण मारहाण करत असल्याचं व्हिडीओत दिसतंय आणि तुमचे पोलीस काय करतायत? पोलीस मारेकऱ्यांना वडापाव घेऊन जात आहेत. त्याला तंबाखू मळून देतायत. चव्हाण म्हणून इथले पोलीस निरीक्षक आहेत ते व्हिडीओमध्ये दिसत आहेत. माझ्याकडे सर्व व्हिडीओ आहेत. गुन्हेगारांची इतकी सरबराई का होतेय.”
सीसीटीव्ही छायाचित्रण पाहून कारवाई करणार : नार्वेकर
दरम्यान, विधीमंडळ परिसरातील हाणामारीच्या घटनेचं सीसीटीव्ही छायाचित्रण तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचा अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.