"आपल्या हक्कासाठी त्या गरिबांना फासावर..." खोटे गुन्हे दाखल केल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप | jitendra awhad latest tweet on 2 fir filed against him in last week rmm 97 | Loksatta

“त्या गरिबांना फासावर…” खोटे गुन्हे दाखल केल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांचे पुन्हा गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड ( संग्रहित छायाचित्र )

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मागील आठवड्यात आव्हाडांवर अवघ्या ७२ तासांच्या आत दोन गंभीर गुन्हे दाखल झाले होते. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी आव्हाडांवर पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ७२ तासांच्या आत आव्हाडांवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेल्या ठिकाणी गर्दीत आव्हाडांनी एका महिलेचा विनयभंग केला, असा आरोप पीडित महिलेनं केला होता. या दोन्ही प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळाला आहे. मात्र, या दोन गुन्ह्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. संबंधित दोन्ही गुन्हे खोटे असून राजकीय दबावापोटी पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केला, असा पुनरुच्चार आव्हाडांनी केला आहे.

हेही वाचा- Sharaddha Murder Case: तपास CBI कडे सोपवणार? युक्तीवादात दिल्ली पोलीस म्हणाले, “८० टक्के…”

माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात गेलो, तर तेव्हा त्याचा नाहक त्रास पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. पण त्या गरिबांचा काहीच दोष नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची बाजू घेतली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचा दोष काय असा प्रश्न उपस्थित करत या अधिकाऱ्यांना ठाण्यात आदेश कोण देते, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचा पुरुच्चार त्यांनी केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना ठाण्यात आदेश देणारी ती व्यक्ती कोण अशी चर्चा यानिमित्ताने शहरात सुरु झाली आहे.

आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, मागील आठवड्यात ७२ तासांत माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांविरुद्ध उद्या मी कोर्टात जाईन, तेव्हा त्याचा नाहक त्रास पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा याच्यात काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे यामध्ये हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरिष्ठ अधिकारी हात वर करून मोकळे होतील. त्यामुळे काय करावं हे सुचत नाही. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवावं कि वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचाही यामध्ये काही दोष नाही, आदेश कुठून आले? हे महाराष्ट्राला माहीत आहे, असंही आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2022 at 14:03 IST
Next Story
VIDEO: “अस्सलाम वालेकुम लाचारांनो” म्हणत भाजपाची सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ व्हिडीओवर टीकेची झोड