गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड या घटनांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसत आहे. अलीकडेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व घटनाक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील राजकारणावर भाष्य केलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
ठाण्यातील एका घटनेचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माहितीसाठी सांगतोय, काल आमच्या काही कार्यकर्त्यांना मारामारीच्या खोट्या गुन्ह्यात अटक केली. सुरुवातीला त्यांच्यावर ३२४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण त्यानंतर ३०७ कलम समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर काल त्यांना जामीन मिळाला आहे.”
हेही वाचा- “आता प्रत्येक बालेकिल्ला…”, कसब्यातील विजयानंतर संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान
“जामिनानंतर आज त्यांना तडीपार करण्यासाठी ठाण्याच्या पोलीस कार्यालयात बैठक सुरू आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असावा. कायदा हा काही लोकांना त्रास देण्यासाठी नसावा. पोलिसांनी निष्पक्ष बाजू घ्यावी, हे संविधानाने सांगितलं आहे. त्यामुळे संविधान माना. अशा बैठका घेऊन निवडक लोकांना तडीपार करण्याची जी सवय लागली आहे, यामुळे तुमचाच नाश होतोय. ज्यांना तडीपार करायला पाहिजे ते तुमच्या आजुबाजूला फिरत असतात. पाच-पाच खून केलेले लोक तुमच्या आजुबाजूला फिरत असतात. तुम्ही मात्र पोलिसांना हाताशी धरून सर्वसामान्य तरुणांना तडीपार करण्याचे प्रयत्न करत आहात, याचा आम्ही निषेध करतो,” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं. कुणाचंही नाव न घेता त्यांनी हे विधान केलं आहे.