Jitendra Awhad post : गेल्या काही महिन्यात मराठवाड्यातील बीड जिल्हा वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिला आहे. बीड जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर सातत्याने टीका केली जात आहे. यादरम्यान आता पुन्हा एकाद बीडच्या केज येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केज तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी आव्हाड यांनी उपोषण करताना शेतकऱ्याचा जीव जाणे हे कृषिप्रधान देशाला काळिमा फासणारी घटना आहे असे म्हटले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या पोस्टनुसार ही महिला आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात केज तहसीलसमोर अमरण उपोषण करत होती. महिलेने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली पण त्यांनी हे प्रकरण आमच्या अखत्यारीत येत नाही असं तिला कळवलं असे आव्हाड म्हणाले आहेत. तसेच त्यांनी कंत्राटदार हर्षल पाटील याच्यानंतर हा देखील राजकीय खूनच असल्याचे म्हचले आहे. आव्हाडांनी आंदोलन स्थळावर मृतदेहाच्या जवळ आक्रोश करणाऱ्या महिलांचा एक व्हिडीओ देखील यावेळी पोस्ट केला आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणालेत?

आमदार आव्हाडांनी केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, “केज तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात बेमुदत आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचे निधन झाले. ही अत्यंत गंभीर आणि दुःखद घटना आहे . कंत्राटदार हर्षल पाटील नंतर हा देखील राजकीय खूनच आहे. सदर महिलेच्या शेतातून अवादा कंपनीने विजेच्या वायर ओढून नेल्या होत्या. त्याविरोधात सदरील महिला उपोषण करत होती. मयत महिलेने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली. पण “आमच्या अखत्यारीत हे प्रकरण येत नाही”, असे पत्र तहसीलदाराने सदरील महिलेस दिले. अशी प्राथमिक माहिती आहे. अखेर शेवटचा उपाय म्हणून ही महिला उपोषणाला बसली असताना तिचा जीव गेला. आत्महत्या करत आधी शेतकरी आपला जीव देतच होते…पण आता उपोषण करताना देखील त्याचे जीव जाताहेत. कृषिप्रधान देशाला ही काळिमा फासणारी घटना आहे.”

हर्षल पाटील प्रकरण काय आहे?

जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे कंत्राटदार सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील (वय ३५, रा. तांदूळवाडी, ता. वाळवा) यांनी शेतात गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. शासनाकडे सुमारे दीड कोटीचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला दात आहे. मृत पाटील यांचे शासनाकडे जवळपास १.४० कोटींची देयके प्रलंबित होती. तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्याने जवळपास ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे आर्थिक विवंचना व देणेकऱ्यांचा तगादा यातून तरुण अभियंत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.