देशभरातील पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. देशात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील जागांवर या दिवशी मतदान होईल. या मतदारसंघांमधील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीचा आज (२७ मार्च) शेवटचा दिवस आहे. तसेच राज्यभरातील इतर मतदारसंघांमधील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अद्याप काही दिवस बाकी आहेत. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीतले नेते राज्यातील काही जागांवरील उमेदवार निश्चित करू शकलेले नाहीत. महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये राज्यातल्या काही जागांवर मतभेद असल्याची चर्चा आहे. काही जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. तर काही जागांवर काँग्रेस, शिवसेना आणि ठाकरे गट हे तिन्ही पक्ष अग्रही आहेत.

प्रामुख्याने सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच चालू आहे. या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं तिन्ही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज (२७ मार्च) त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेनेने त्यांच्या १७ उमेदवारांची नावं जाहीर केली असून यामध्ये सांगलीच्या जागेचाही समावेश आहे. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. परंतु, त्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यासह भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच चालू आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील या जागेवर दावा केला आहे.

दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पक्षातील सर्व नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आव्हाड म्हणाले, आजच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा झाली. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी शरद पवार आम्हा सर्व नेते, पदाधिकारी आणि आमदारांची मतं ऐकून घेत होते. राज्याचं राजकीय वातावरण कसं आहे, लोकांचं म्हणणं काय आहे आणि आम्हाला मिळणाऱ्या जागांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. कोणाला कोणत्या आणि किती जागा मिळणार याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

हे ही वाचा >> “मला राजकारणात हलक्यात घेऊ नका, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

यावेळी आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही भिवंडीची जागा काँग्रेससाठी सोडली आहे की अजूनही तुमचा या जागेवर दावा आहे? त्यावर आव्हाड म्हणाले, भिवंडीबाबत अजूनही चर्चा चालू आहे. शरद पवार हे त्याबद्दल निर्णय घेतील. इतके मोठे निर्णय केवळ शरद पवारच घेऊ शकतात.