विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी दरवर्षी आषाढीच्या आधी वारीला निघतात. या वारीत एक वेगळाच उत्साह असतो. वारीत सगळे एकमेकांना माऊली असंही संबोधतात. वारीतल्या या लाखो वारकऱ्यांसाठी सरकारने महाआरोग्य शिबीरं आयोजित केली आहेत. मात्र ही शिबीरं नसून विठ्ठलाच्या नावाने दरोडा आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

काय आहे जितेंद्र आव्हाडांची पोस्ट?

विठ्ठलाच्या नावाने दरोडा
दे देते भगवान को धोका
इन्सान को क्या छोडेंगे

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आय़ोजित करण्यात आली आहेत. वारकऱ्यांसाठी २ कोटी ४० लाखांची औषधे खरेदी केली जाणार आहेत. तर आरोग्य शिबीरात तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली कंत्राटदारांचे घर भरण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

महाआरोग्य शिबीर वारकऱ्यांसाठी की कंत्राटदारांसाठी?

पंढरपूर येथे आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल होत असतात. त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, गेल्या वर्षापासून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात महाआरोग्य शिबिराचे आय़ोजन केले जाते. त्यासाठी राज्य शासन आर्थिक तरतूद करतो. यंदा तीन ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. त्यासाठी ९ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ४० लाख रुपयांच्या औषधांचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तैनात ४ हजार ३२० मनुष्यबळाच्या जेवणाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपये केला जाणार आहे. जो इतर खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

हे पण वाचा- “…म्हणून देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले”, आव्हाडांकडून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला श्रेय

महाआरोग्य शिबिरासाठी मंडप, सीसीटीव्ही, साहित्य, वाहतूक यासाठी एकूण ९ कोटी ४४ लाख रुपये खर्च राज्य सरकारने मंजूर केला आहे. तीन ठिकाणी तीन दिवसांसाठी हे आरोग्य शिबिर होणार आहे. तेथे वारकऱ्यांना मोफत उपचार व औषधे पुरवली जाणार आहेत. त्यासाठीच्या खर्चाला राज्य सरकारचे अवर सचिव अ. भि. मोरे यांनी मंजुरी दिली आहे. यात एकूण खर्च ९ कोटी ४० लाख रुपये होणार असून, वारकऱ्यांच्या वाट्याला मात्र केवळ २ कोटी ४० लाखांची औषधे येणार आहेत. उर्वरित ७ कोटी ४० लाख रुपये कसे खर्च करण्यात येणार आहेत?

जेवणांवर होणार ३ कोटींचा खर्च

महाआरोग्य शिबिर तीन ठिकाणी होणार असून, ते तीन दिवस असते. त्यापैकी पहिले महाआरोग्य शिबिर वाखरीत, दुसरे तीन रस्ता आणि तिसरे गोपाळपूर येथे असेल. यासाठी आरोग्य विभागाकडून विशेषज्ञ डॉक्टर, फिजिशियन, फार्मासिस्ट, असे मिळून प्रत्येक शिबिरासाठी १४४० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या तीन दिवसांच्या खानपानासाठी तब्बल ३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजे औषधे २ कोटी ४० लाखांची आणि खानपान ३ कोटींचा.

महाआरोग्य शिबिराचे अंदाजित खर्च

मंडप – ९० लाख

बैठक व्यवस्था, फर्निचर, खुर्ची – १२ लाख

स्वच्छतागृह व्यवस्था – १५ लाख

डॉक्टर, नर्सेस अल्पोपहार, भोजन खर्च – ३ कोटी

जागा भाडे खर्च – ६ लाख

सीसीटीव्ही, डिजिटल स्क्रीन – १५ लाख

निवास व्यवस्था – १ कोटी ८० लाख

सतरा ठिकाणी उपचार केंद्रांचा खर्च – २० लाख

आकस्मिक खर्च, केसपेपर, इंटरनेट, वॉकीटॉकी – ३५ लाख

वीज कनेक्शन, वीज बिल – ६ लाख

वाहतूक व्यवस्था अन् इंधन खर्च – १० लाख

आरोग्य दूत इंधन खर्च – १० लाख

औषध व औषधी साहित्य सामग्री – २ काेटी ४० लाख

एकूण खर्च – ९ कोटी ४४ लाख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा थेट हिशोब मांडत जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर महाघोटाळ्याचा आरोप केला आहे. या आरोपांना राज्य सरकारकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.