“तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून पाहिल्यास बरं होईल,” असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे आव्हाड यांनी हा टोला एका आमदाराला लागवला आहे. त्यातही हा आमदार विरोधी पक्षाचा नसून सध्या राज्यात ज्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी सत्तेत आहे त्याच पक्षाच्या आमदारावर आव्हाडांनी कठोर शब्दात टीका केलीय. आव्हाड यांनी हा सल्ला ज्या आमदाराला दिलाय त्या आमदाराचे नाव आहे, महेश शिंदे.

कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रयत शिक्षण संस्था आणि शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. याच टीकेवर आता आव्हाड यांनी महेश शिदेंना उत्तर दिलंय. शिंदेंना उत्तर देताना शरद पवारांमुळे रयत शिक्षण संस्था आत गावागावांमध्ये पोहचल्याचं आव्हाड म्हणालेत. इतकच नाही तर शिवसेनेच्या या आमदाराला तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून घ्या असा खोचक सल्लाही आव्हाड यांनी दिलाय.

शिंदे काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे, अशी मागणी कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहिली होती. त्यामध्ये त्यात महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, असं म्हटलं. मात्र, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केलाय.

नक्की वाचा >> मुंबईत रजिस्टर तर गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने मुलीचं लग्न का?; स्पष्टीकरण देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “काही विकृत…”

बारामतीचा उल्लेख करत केलेली टीका…
“रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून घेतलं जातं. याचे दुःख वाटते. रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं आहे. आज रयतमध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने पैसे मागितले जातात. बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतेचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे,” असंही महेश शिंदे म्हणाले होते.

नक्की वाचा >> शरद पवारांवर टीका करणाऱ्या शिवसेना आमदाराला शशिकांत शिंदेंनी सुनावलं; “दोन वर्षांच्या सत्तेने डोक्यात हवा आणि गर्व…”

एकाच परिवारातील ९ जण रयत संस्थेच्या कार्यकारणीत…
“शरद पवारांनी वंशपरंपरागतीने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिलं, तर रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अशांना या संस्थेवर घेतले. त्यामुळे जनतेचा विचार करून शरद पवार रयतचे अध्यक्षपद सोडतील,” अशी खोचक टीकाही शिंदे यांनी केलीय. “एकाच परिवारातील ९ जण रयत संस्थेमध्ये कार्यकारिणीत आहेत. त्यांचे रयतसाठी योगदान काय?” असा सवालही आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केला होता.

त्यामागे फक्त शरद पवार होते…
महेश शिंदे यांनी केलेल्या या टीकेला आता आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्था आज तळागाळात पोहचल्याचं आव्हाड म्हणालेत. “तुम्ही शरद पवारांच्या उंचीपेक्षा केवळ दोन इंच छोटे आहात असं तुमच्या वक्तव्यामध्ये म्हटलंय. शरद पवार उंचीमुळे ओळखले जात नाहीत त्यांच्या कर्तुत्वामुळे ओळखले जातात. रयत शिक्षण संस्था ज्या उद्देशाने बनवली होती, बहुजनांच्या हितासाठी. त्याचा ज्या पद्धतीने फैलाव झाला. त्याची पाळंमुळं गाव खेड्यांपर्यंत पसरली, त्यामागे फक्त शरद पवार होते,” असं आव्हाड यांनी पवार यांचं संस्थेतील योगदान काय आहे हे सांगताना म्हटलंय.

नक्की वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन बोलणाऱ्यांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “आपला बाप आजारी असताना आपण…”

लाज स्वत:च्या हाताने घालवू नका
महेश शिंदे यांना सल्ला देताना, “आपण ज्या माणसाबद्दल बोलतोय. त्याच्यासमोर आपलं कर्तुत्व कितीय हे कधीतरी तपासा. बोलायला तुम्ही फार बोलू शकता. बोलायला तुम्हाला कोण आडवणार. तुम्हाला कोणीच आडवू शकत नाही. स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका,” असं आव्हाड म्हणालेत. तसेच, “तुम्ही उंचीने किती आहात याबद्दल माझा प्रश्न नाही. पण तुमचा मेंदू कुठे आहे हे तपासून पाहिल्यास बरं होईल,” असा खोचक टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.

प्रसिद्धी मिळते म्हणून…
“शरद पवारांवर वैयक्तिक टीका करुन काहीजण आपण फार कर्तुत्वान आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा बातम्यांमुळे टीव्हीवर चमकायला मिळतं आणि वृत्तपत्रांमध्येही नावं यायाला सुरुवात होते. कुठल्या गावातला कोण महेश शिंदे. यांची गौरी शंकर नावाची शिक्षण संस्था आहे. त्यांचे मावस भाऊ का मामेभाऊ आहेत मदन जगताप त्यांच्यासोबत ५० टक्के पार्टनरशीप आहे. काय झालं या शिक्षण संस्थेमध्ये? क्लार्कचा पगार नाही, प्राध्यापकांचा पगार नाही. विद्यार्थ्यांच्या फीचं काय? त्याचा आतापता नाही. तुमच्या साखर कारखान्याचं काय झालं होतं? शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते,” असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.