मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर केली आहे. “एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आले. तळागळातून संघर्ष करत वर येणारे नेतृत्व आज महाराष्ट्राच्या प्रमुखपदी बसले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे हे आमच्या निवेदनाची साधी दखलही घेत नव्हते”, अशी टीका जोगेंद्र कवाडे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर केली.

कवाडे यांचा लाँग मार्च योग्य ठिकाणी पोहोचला – शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. जोगेंद्र कवाडे यांनी संघर्षाच्या काळात चळवळीत खूप मोठे योगदान दिलेले आहे. चळवळीसाठी त्यांनी सहा महिने तुरुंगवासही भोगला. कवाडे यांची आक्रमकता भल्याभल्यांना घाम फोडणारी होती. जोगेंद्र कवाडे यांचा लाँग मार्च आता योग्य ठिकाणी पोहोचला आहे”, अशी मिश्किल टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंनी आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही

नागपूर मधील अंबाझरी उद्यानाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर चार कोटी रुपये खर्च करुन डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक भवन उभारले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही वीस एकरची जागा पर्यटन विभागाला देण्यात आली. तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या जागेवर बुलडोजर फिरवला. हे होत असताना आम्ही सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना भेटलो, आमचे म्हणणे मांडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चार वेळा निवेदन दिले. आदित्य ठाकरेंचीही भेट घेऊन निवेदन दिले. पण आमच्या निवेदनाची साधी दखलही त्यांनी घेतली नाही. पण शिंदे सरकारकडे आम्ही ही मागणी मांडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी भूमिका जोगेंद्र कवाडे यांनी मांडली.