हिंगोलीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आधी बंडखोर आमदारांना शिवसेनेत परत येण्याचे आवाहन करत रडतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे लोकांनी त्यांच्या शिवसेनेसोबतच्या निष्ठेसाठी कौतुक केलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हेच संतोष बांगर अचानक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता याच संतोष बांगर यांना हिंगोलीत पत्रकारांनी तुम्ही अचानक निर्णय का बदलला असा सवाल केला. यावर संजय बांगर यांनी “मी निघून जाऊ का येथून?” असं विचारत ‘नो कॉमेंट्स’ अशी प्रतिक्रिया दिली.

काही दिवसांपूर्वीच बंडखोरांविरोधात कडवट भूमिका घेणारे, आंदोलन-मोर्चा काढणारे संतोष बांगर शिंदे गटात दाखल झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळेच संतोष बांगर तिकडे जाण्याचं कारण काय असा सवाल विचारला जात आहे. मात्र, स्वतः संतोष बांगर यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे.

“आदल्या दिवशी रडणारे आमदार गेले”

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला होता. “जे आमदार आदल्या दिवशी आपल्या मतदारसंघात जाऊन रडत होते ते शिवसेना सोडून गेले तेव्हा आश्चर्य वाटलं. मात्र, अशा लोकांना जनता व मतदार पुन्हा उभं करणार नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं.

संजय राऊत म्हणाले होते, “काल तर एक आमदार गेले त्यामुळे आश्चर्यच वाटलं. आदल्या दिवशी हेच आमदार त्यांच्या मतदारसंघात जाऊन रडत होते. हिंगोलीत लोकांनी त्यांचं स्वागत केलं होतं. एक निष्ठावान म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? अशा लोकांना जनता व मतदार पुन्हा उभं करणार नाही, असं मी खात्रीने सांगतो.”

संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली इनसाईड स्टोरी

कनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामी गेल्यानंतर संतोष बांगर यांनी या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करताना त्यांना अश्रूदेखील अनावर झाले होते. मात्र हेच बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. याबद्दल आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? याबद्दल विधिमंडळात माहिती दिली आहे.

हेही वाचा : VIDEO: “मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत”; महिला शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंसमोरच बंडखोर आमदारांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते घाबरत होते, पण त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला”

“संतोष बांगर यांना मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला होता. मला कसं बोलावं म्हणून ते घाबरत होते. पण त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला. मला यायचं आहे, माझी चूक झाली आहे. आणखी तीन ते चार लोक आहेत, त्यांचही मत असंच आहे, असं बांगर यांनी मला सांगितलं. नंतर मी बांगर यांना सांगितलं की, आपल्याला खोटं काहीही करायचं नाही,” असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.