जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’, असं आवाहन केलं आहे. त्यांनी सोमवारी (८ मे) सांगली येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वेबसाईटने एक लाख वाचकांचा टप्पा पार केल्याच्या फलकाचे अनावरण आणि अंनिस वार्तापत्राच्या मे २०२३ अंकाचे प्रकाशन निखिल वागळे यांच्या हस्ते करण्यात आले.

निखिल वागळे म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपल्यामध्ये निर्भयता असणे गरजेची असते. म्हणून अंनिसचं ब्रीदवाक्य ‘विज्ञान निर्भयता नीती’ आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्कूटरवर ‘निर्भय बनो- महात्मा गांधी’ असे लिहिले होते. महात्मा गांधीनी चंपारण्य सत्याग्रहावेळी निर्भय बनोचा नारा दिला होता. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या वेळी पुन्हा याचा पुनरुच्चार केला. आज भारतीय संविधानात निर्भय बनो हे तत्त्व आहे.”

“हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’ अभियान”

“२०१४ पासून देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपले धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र धर्माधारीत राष्ट्र करण्याचा मनसुबा आहे. हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी आम्ही ‘निर्भय बनो’ हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये आम्ही फुले शाहू आंबेडकर यांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत,” असं निखिल वागळे यांनी सांगितलं.

हेही वाचा : आठ दिवसांपूर्वी प्रकल्पांचं समर्थन करणाऱ्या राजन साळवींची भूमिका का बदलली? उद्धव ठाकरे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दाभोलकरांचे कार्य टिकवणे आपली जबाबदारी”

“नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्याचं कार्य पुढे नेले, वाढवलं आहे. दाभोलकरांचे कार्य टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी मी अंनिससाठी महिन्यातील एक दिवस देणार आहे,” अशी घोषणा निखिल वागळे यांनी केली. कार्यक्रमांचे प्रास्ताविक फारुक गवंडी, स्वागत राहुल थोरात तर आभार वाघेश साळुंखे यांनी मांडले. या कार्यक्रमाला डॉ. प्रदीप पाटील, डॉ. संजय निटवे, डॉ. सविता अक्कोळे, गीता ठाकर, जगदीश काबरे, सुजाता म्हेत्रे, स्वाती वंजाळे, आशा धनाले, अमर खोत, संजय कोले,निलम मागावे, अमित शिंदे, प्रविण शिंदे उपस्थित होते.