ढवळय़ापवळय़ाची दुडक्या चालीची जोडी, त्यांच्या घुंगरांचा नादावणारा आवाज, बैलगाडीत बसलेल्या-चालणाऱ्या भाविकांच्या ओठातून येणारा चांगभलंचा पुकारा, असा आगळा बाज दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत पाहायला मिळतो आहे. यात्रामार्गावर बैलगाडय़ांच्या ताफ्यातून प्रवास करणाऱ्या भाविकांची ही वेगळी मांदियाळी दृष्टीस पडते. रातोरात सातासमुद्रापार जाण्याची झालेली सोय, दळणवळणाच्या आधुनिक सुविधा आणि अगदी गावोगावीही वाहनांचा राबता असूनही ‘जोतिबाच्या नावाने चांगभलं’चा गजर करीत बैलगाडय़ांचा ताफा रणरणत्या उन्हात देवदर्शनासाठी आजही कूच करतो आहे.
अलीकडच्या काळात प्रवासाची साधने बदललेली असून त्यात नावीन्य सामावले आहे. पण आजही बैलगाडीतून यात्रेचा आनंद लुटण्याचा प्रकार काही औरच आहे. भल्या पहाटे उठायचे. तळे-विहिरीकाठी अंघोळी आवरायच्या. उन्हं वाढीस लागण्यापूर्वीच मोठा पल्ला गाठायचा. सूर्य डोईवर आला की वटवृक्षाखाली बठक ठोकून जेवणाची तयारी करायची. तीन दगडांच्या चुलीवर बनवलेली गरमागरम भाकरी, खमंग पिठलं, सोबतीला कांदा-लोणच्याची फोड.. अशी अस्सल गावरान खाद्यसंस्कृती चाखायची. थोडीशी डुलकी घ्यायची. मग जरासा चहा पिऊन झाला की सूर्य मावळेपर्यंत जोतिबा डोंगराच्या दिशेने चालू लागायचे. साधारण असा असतो बैलगाडीतून जत्रास्थळी जाणाऱ्या भाविकांचा दिनक्रम.
पण जत्रेला जायचे म्हणजे जुंपली गाडी नि लागलो रस्ता कातरायला, असे काही सोपे नसते. त्याची तयारीही मायंदाळ. पंचक्रोशीत भरणारा आठवडी बाजार गाठायचा. तेथे बलांच्या नख्या व्यवस्थित करायच्या. मग पायाला नाल, नखाला पॉलिश, खांद्याला चाळे-घुंगरू, उठून दिसणारी झूल,शिंगाला पितळेचे टोक, बािशग असं बरंच काहीबाही विकत घ्यावं लागतं. जुनं साहित्य असलं तरी ते बेस्तवार (व्यवस्थित) करून घ्यावं लागतं. शिवाय, बलगाडी रंगवणं. गाडीच्या रंगानेच बैलाचे शिंगही रंगवून काढून रंगसंगती साधायची. बेंदराला जसं सजवलं जातं तसंच जोतिबाच्या यात्रेला जातानाही ढवळय़ापवळय़ाला सजवलं जातं.
सारी तयारी झाली. की मग जोतिबाचा डोंगर गाठायचा प्रवास सुरू होतो. गाडीवर गोल छत, त्यामध्ये गवत, त्यावर गादी टाकली जाते. सामानसुमान भरलं जातं. कोल्हापूर-सांगली जिल्हय़ातील ग्रामीण भागातून बलगाडीतून जत्रेला जाणारा भाविकवर्ग आहे. तसेच आठ-पंधरा दिवसांचा प्रवास करणारे कर्नाटकातील भाविक तर बरेच आहेत. बैलगाडी प्रवास-जोतिबा दर्शन या निमित्ताने अवघे कुटुंब, गोतावळा कैक दिवसांनंतर एकत्र आलेला असतो. चांद राती गार वारे अंगावर घेत मोकळय़ा रानात गप्पांचा फड रंगतो. पीकपाणी, शेतीवाडी, पाहुणे-रावळे, देणे-घेणे यापासून ते राजकारण, बदलते जग अशा अनेक मुद्यांवर चर्चा होत राहते. निद्रेच्या अधीन जाण्यापूर्वी डोळय़ांत स्वप्न उतरते ते जोतिबाच्या दर्शनाचे.