सहाशे गाड्यांचा ताफा पाहून सोलापूरकर थक्क
सोलापूर : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे अध्यक्ष,तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी हैदराबादहून सोलापुरात दाखल झाले.त्यांचे वाजतगाजत, पुष्पवर्षाव करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या सोबत पक्षाचे आमदार-खासदार व प्रमुख नेत्यांसह आलेला सहाशे मोटारींचा ताफा पाहून सोलापूरकर थक्क झाले.
चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळ आणि सहकारी आमदार-खासदारांसह दुपारी हैदराबादच्या प्रगती भवनातून सोलापूरकडे निघाले असताना इकडे सोलापुरात त्यांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी विविध हाॕटेलांमध्ये २२५ खोल्यांची सोय करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी शहरात तेलुगुभाषकांच्या प्रभावाखालील पूर्व भागात अनेक ठिकाणी भारत राष्ट्र समिती पक्षाचे ध्वज उभारण्यात आले होते. केसीआर यांचे सायंकाळी हैदराबाद जुन्या नाक्यावर सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीपासून ते होटगी रस्त्यावरील बालाजी सरोवर पंचतारांकित हाॕटेलपर्यंत अनेक ठिकाणी रस्ते व चौकांमध्ये केसीआर यांच्या मोठ्या प्रतिमांसह बीआरएस पक्षाचे गुलाबी रांगाचे ध्वज आणि गुलाबी पताका उभारण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर वाजतगाजत, पुष्पवृष्टीही करण्यात आली. वाटेत केसीआर यांंनी माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारला. मुक्कामासाठी हाॕटेलात आगमन होताच हलगी वाद्यांच्या कडकडाटात केसीआरप्रेमी नागरिक व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. केसीआर यांच्यावर गुलाब फुलांचा वर्षाव झाला. यावेळी हाॕटेल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
रात्रीच्या मुक्कामानंतर उद्या मंगळवारी सकाळी केसीआर व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह आमदार-खासदार पंढरपूरला रवाना होतील आणि विठ्ठल मंदिरात पूजा आणि दर्शन करतील. पंढरपूरहून परत येताना तुळजापूर येथे थांबून तुळजाभवानी मंदिरातही केसीआर हे ताफ्यासह दर्शन घेणार आहेत. तत्पूर्वी, पंढरपुरात सरकोली येथे- राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या गावात सरकोली येथे केसीआर व त्यांचे सहकारी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी भगीरथ भालके हे आपल्या सहका-यांसह बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.केसीआर यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ व आमदार-खासदारांचे आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूर (आणि तुळजापूर) दौरा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
पंढरीत हेलिकाॕप्टरने पुष्पवृष्टीला परवानगी नाकारली
आषाढी वारीसाठी पंढरपुरात आल्यानंतर केसीआर यांच्याकडून हेलिकाॕप्टरमधून विठ्ठल मंदिरासह प्रमुख संतांच्या पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा बेत आखण्यात आला होता. परंतु सुरक्षा व्यवस्थेचे कारण सांगून प्रशासनाने पुष्पवृष्टी करण्यास परवानगी नाकारली. बीआरएसचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे.