Devendra Fadnavis : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांचा विषय चांगलाच चर्चेत आहे. मुंबई महापालिकेने दादर येथील प्रसिद्ध कबुतरखान ताडपत्री टाकून झाकला होता. ज्यानंतर जैन समाजाने ६ ऑगस्टला आंदोलन करत हा कबुतरखाना पुन्हा सुरु केला. मात्र आज मराठी एकीकरण समितीतर्फे पुन्हा एकदा कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. लोकांच्या आरोग्याचा हा विषय आहे असं आंदोलक म्हणाले. तर जैन समाजाचं म्हणणं आहे की हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं की मुंबईत कबुतरखाने असणार का? त्यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मी स्पष्टपणे हे सांगू इच्छितो की की कबुतरखान्यांच्या बाबतीत एकीकडे आरोग्याचा विषय आहे आणि दुसरीकडे आस्थेचा विषय आहे. दोन्ही गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. आरोग्याकडे आधी लक्ष द्यावं लागेल. पण यावर आपण उपाय करु शकतो. दादर किंवा इतर ठिकाणचे कबुतरखाने म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसारखा विषय नाही. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर आम्ही समिती स्थापन केली आहे. ही समिती यावर अभ्यास करते आहे. लोकांचं आरोग्य आणि लोकांची आस्था या दोन्ही समतोल साधून यातून मार्ग काढू.”

जैन समाज आणि मराठी आंदोलकांच्या कारवाईबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

जैन समाजाच्या आंदोलकांवर कारवाई झाली, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांवरही कारवाई झाली. ही कारवाई म्हणाल तर झालीही आणि म्हणाल तर झाली नाही. कारण पोलिसांनी जे आंदोलन करणारे लोक होते त्यांना थांबवलं आणि बरोबर नेलं. बाकी गुन्हे दाखल केले नाहीत. दादरमध्ये आज तीस लोक होते. कुठलीही कठोर कारवाई पोलिसांनी केली नाही. जिथे कायदा सुव्यवस्थेचा फार प्रश्न येत नाही त्यात फक्त पोलीस ताब्यात घेतात आणि एखादी नोटीस देऊन सोडून देतात. त्यापलिकडे काही कारवाई होत नाही. महापालिकेच्या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत असले सगळे विषय पुढे आणले जातीलच. मी कायमच हे म्हणतो की असं करुन मराठी आणि अमराठी वाद निर्माण करु शकत असाल तर त्यांना मुंबई समजलीच नाही असं मी म्हणेन. मुंबईत या गोष्टी चालणार नाही कारण आम्ही कधीही भेदभाव केला नाही. मराठी माणसाठी १० वर्षांत आम्ही काय केलं आणि जे मराठीची जपमाळ ओढतात त्यांनी काय केलं याचा हिशेब मांडा तुम्हाला लक्षात येईल कुणी काम केलं. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची CNN News 18 Town Hall या कार्यक्रमात उपस्थिती होती. या कार्यक्रमातल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं.

उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणातले गजनी-देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मोदींनी दिला. युपीएच्या काळात असा काही निर्णय झाला नाही. आज जर नीट पाहिलं तर मराठी अस्मितेचे जे विषय आहेत त्या मागण्या पूर्ण करणारं सरकार आमचं आहे. मुंबईच्या मूळ भागातून मराठी वस्त्यांमधून यांच्या काळात लोक मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या ठिकाणी गेले. आम्ही त्या मराठी माणसांना घरं देत आहोत. उद्धव ठाकरे हे राजकारणातले गजनी आहेत. त्यांना सोयीस्कररित्या सगळ्याचा विसर पडतो. महाराष्ट्रात सक्तीचं काय असेल तर मराठीच सक्ती आहे. त्यानंतर दोन भाषा व्यवहारासाठी शिकवल्या जातात ज्या हिंदी आणि मराठी आहेत. कारण हिंदी भाषा सक्तीचा जीआर उद्धव ठाकरेंच्याच कार्यकाळातला आहे.”