लोकसत्ता ऑनलाइन, सातारा
कोंबडी पालन व्यवसायात आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पाटण पोलिसात दाखल केली आहे. इस्लामपूर येथील रयत ऍग्रो इंडिया व महारयत ऍग्रो इंडिया कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते संदीप मोहिते गणेश शेवाळे यांच्या विरोधात सचिन काशिनाथ शिर्के (निराळे,ता पाटण) यांनी तक्रार दिली आहे. यावेळी पोलिसांनी यांचं नाव सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत संशयितांच्या यादीत टाकलं होतं. पण नंतर त्यांनी ही प्रिंटिंग चूक असल्याचं सांगत साक्षीदार असल्याची माहिती दिली.
तक्रारीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय कराड येथील पांढरा मारुती मंदिराजवळ व दत्त चौकातील रयत ऍग्रो इंडिया कंपनी कार्यालयात गेलो. तेथे विष्णू भैरव गोरे हे माझ्या परिचयाचे होते. त्यांना तिथे सोबत घेऊन गेलो होतो. तिथे मला कोंबडी पालन व्यवसायाची माहिती देण्यात आली. २०० पक्षांसाठी ७५ हजार रुपये भरल्यानंतर भांडी, औषधे, खाद्य, डॉक्टर उपचार कंपनी करणार असे सांगण्यात आले होते. यावेळी मी चाळीस हजार रुपये बुकिंग व करारासाठी भरले. कार्यालयात गेलो असता तिथे संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे, वसीम, दमाने मॅडम आणि सागर खोत उपस्थित होते. रक्कम भरल्यानंतर कंपनीचे पक्षी पुरवण्यात आले. परंतु नंतर पक्षी, अंडी नेली नाहीत तसंच ठरल्याप्रमाणे खाद्य सेवाही पुरवली नाही. तीन युनिट मधील ७० टक्के पक्षांचा सेवाअभावी मृत्यू झाला. ठरलेल्या कराराप्रमाणे सेवा दिले नाही व नुकसान केले म्हणून त्याची विचारणा करण्यासाठी इस्लामपूर येथील कार्यालयात गेलो असता धक्काबुक्की करून बाहेर करण्यात आले व पैसे नंतर देऊ सांगितले. नंतर कार्यालयात गेलो असता तेथील कार्यालय अनेक दिवस बंद होते.
सचिन काशिनाथ शिर्के यांच्यासह पाटण तालुका व सातारा जिल्ह्यातील एकूण ७२ जणांनी दीड कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुधीर मोहिते, संदीप मोहिते आणि शेवाळे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सचिन शिर्के यांनी यासंबंधी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “मी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. कुणावर गुन्हा दाखल करायचा हा पोलिसांचा प्रश्न आहे. मी पैसे देताना सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत कंपनीत उपस्थित होते. त्यांचा त्यात काय संबंध आहे याची मला कल्पना नाही. पोलिसांनी त्याचा तपास करावा,”.
“तर सागर खोत यांचा कडकनाथ कोंबडीच्या दीड कोटीच्या फसवणूक प्रकरणाचा काही संबंध नाही. फिर्यादी मध्ये आरोपींच्या यादीत त्यांचे नाव चुकून गेले आहे. पैसे देताना ते कार्यालयात उपस्थित असल्यामुळे ते या प्रकरणात साक्षीदार आहेत. आमच्याकडून प्रिंटिंगची चूक झाल्याने त्यांचे नाव संशयितांच्या यादीत गेले आहे,” असे पाटणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितले आहे.