सातारा: सातारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शहराची, उपनगरांची व गावांची स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या साताऱ्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने पाण्याची मोठी आवक या धरणांमध्ये होत आहे. त्यामुळे कृष्णा व वेण्णा या नद्यातून धोम व कान्हेर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय धरणांच्या खालील भागातूनही ओढ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांमध्ये मिसळत आहे. यामुळे नद्यांना पूर आला आहे.
सातारा शहराची कैलास स्मशानभूमी अत्यंत आखीव रेखीव बांधलेली आहे. संगम माहुली येथील या स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. यामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. पाण्याचा वेग जोरदार असल्याने स्मशानभूमीचा काही भागही वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच्या वरच्या बाजूला तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
स्मशानभूमी कैलास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चालविली जाते. स्वच्छता आणि शिस्त यासाठी ही स्मशानभूमी ओळखली जाते. सातारा शहर आजूबाजूची उपनगरे आणि गावे या सर्वांसाठी ही स्मशानभूमी वीस वर्षांनी वापरात आहे. स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यामुळे या सर्व परिसरातील मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता.
स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने स्मशानभूमीच्या वरच्या बाजूला अंत्यसंस्काराची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. पुरामुळे या स्मशानभूमीचा काही भाग वाहून गेला असण्याची शक्यता आहे. तरीही पाणी कमी होताच स्मशानभूमीचे कामकाज पूर्ववत करण्यात येईल. – राजेंद्र चोरगे
अध्यक्ष, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा.