जालना – लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे आणि भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे शनिवारी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र आले. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील पाणीपुरवठा योजना आणि बसस्थानक भूमिपूजन कार्यक्रमात शेजारी बसलेल्या या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात काहीशा हलक्या-फुलक्या शब्दांत एकमेकांवर शेरेबाजीही केली!

गेल्या लोकसभा निवडणुकीत सलग पाच वेळेस निवडून आलेल्या दानवे यांचा डॉ. काळे यांनी पराभव केला. त्यानंतर हे दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले नव्हते. जाफराबाद नगरपंचायतीच्या ४ कोटी ४३ लाख खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या नगरपंचायतीच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) तर उपाध्यक्ष काँग्रेसचे आहेत. यावेळी डॉ. काळे आपल्या भाषणात रावसाहेब दानवे यांना उद्देशून म्हणाले की, मी आणि आमदार संतोष दानवे दोघे विकासकामे मंजूर करून आणतो परंतु श्रेय घेणारी बातमी मात्र तुमच्या नावाने निघते. त्यावर आपल्या शैलीत रावसाहेब दानवे त्यांना म्हणाले, तुमचे आणि माझ्या मामाचे गाव एकच आहे. तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात आणि तुम्हाला मी सांभाळलेले आहे. तुम्ही खासदार असताना भूमिपूजन होत असले तरी त्याची मंजुरी मात्र माझ्या काळातील आहे.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि यामध्ये जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आमदार संतोष दानवे, नगरपंचायतीच्या अध्यक्षा सुरेखा लहाने यांची भाषणे यावेळी झाली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भाजपचे जालना शहर अध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती यावेळी होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीत सलग पाच वेळेस निवडून आलेल्या दानवे यांचा डॉ. काळे यांनी पराभव केला. त्यानंतर हे दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले नव्हते. शनिवारी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र आले. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील पाणीपुरवठा योजना आणि बसस्थानक भूमिपूजन कार्यक्रमात शेजारी बसलेल्या या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात काहीशा हलक्या-फुलक्या शब्दांत एकमेकांवर शेरेबाजीही केली!