अहिल्यानगर: नगर तालुक्यातील, भिंगारजवळील ब्रिटिशकालीन कापूरवाडी तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून, त्यामुळे नागरदेवळे गावाला धोका निर्माण झाल्याकडे ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पाण्याचा दाब वाढून तलावाच्या भिंतीला भगदाड पडण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे.

खासदार नीलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ सुशील कदम, निखिल शेलार यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन दिले. या वेळी सागर खरपुडे, सागर चाबुकस्वार, मुकेश झोडगे, राजेश धाडगे, मोहसीन पठाण, समीर पठाण आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की लष्कराच्या हद्दीत असलेल्या या ब्रिटिशकालीन तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे, बाभळी वाढल्याने व भिंतीमधून पाणी पाझरण्याने दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नाले, ओढे, बंधारे तुडुंब भरले आहेत.

कापूरवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या दोन दिवसांपासून सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात वाहत आहे. त्यामुळे नागरदेवळे गावाकडे जाणाऱ्या अनेक पुलांवरून पाणी वाहून संपर्क तुटला होता. तलाव लष्करी हद्दीत असल्याने अनेक वर्षांपासून गाळउपसा झालेला नाही. त्यामुळे पाण्याचा दाब वाढून धोक्याची घंटा वाजू लागली आहे. तलावाच्या भिंतीला भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त होत असून, यामुळे नागरदेवळे गावठाण, पाखरेमळा, पानमळकर मळा, पादीर मळा, बिने मळा, लोंढे मळा, खरपुडे वस्ती तसेच भिंगारलगतचा परिसर धोक्यात आला आहे. भिंत फुटल्यास प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे.

कापूरवाडी तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करावे, तलावाच्या बांधावरील झाडेझुडपे व गवताची तातडीने स्वच्छता करावी, पाऊस थांबल्यानंतर व पाणी कमी झाल्यावर तलावातील गाळ उपसा करण्याचा ठोस निर्णय घ्यावा आणि ग्रामस्थ, लष्करी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भिंगारजवळील ब्रिटिशकालीन कापूरवाडी तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून, त्यामुळे नागरदेवळे गावाला धोका निर्माण झाल्याकडे ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पाण्याचा दाब वाढून तलावाच्या भिंतीला भगदाड पडण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे. या वेळी खासदार नीलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ सुशील कदम, निखिल शेलार यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन दिले. या वेळी सागर खरपुडे, सागर चाबुकस्वार, मुकेश झोडगे, राजेश धाडगे, मोहसीन पठाण, समीर पठाण आदी उपस्थित होते.