कराड : बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आणून तब्बल ५० लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कराड शहर परिसरातील गजानन हौसिंग सोसायटी येथे ही कारवाई करण्यात आली. यामुळे बनावट सोन्याच्या व्यवहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. एका सोनाराने दाखवलेली सतर्कता व पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे तीन जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. गोविंद एकनाथराव पदातुरे (रा. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव आनंदा कदम (रा. पिसाद्री, कोल्हापूर) व अधिक आकाराम गुरव (रा. म्हासुर्णे, खटाव) अशी याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आसिफ अकबर मुल्ला हे शहरातील मुजावर कॉलनीत राहण्यास असून, त्यांचे रॉयल ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एकजण दुकानात आला. त्याने त्याचे नाव गोविंद पदातुरे असल्याचे सांगून, माझ्याकडे चोवीस कॅरेटचे ५०० ग्रॅम शुद्ध सोने आहे, ते मला विकायचे असल्याचे सांगितले. पदातुरे याने त्याच्याकडील बिस्किटांपैकी एक बिस्कीट पांढरी प्लास्टिक पिशवीतून काढून आसिफ मुल्लांना दाखवले. हे बिस्कीट पाहताक्षणीच खरे वाटल्याने मुल्ला यांना संशय आला.
त्याचवेळी गोविंदने आपल्या मित्राच्या घरी गजानन हौसिंग सोसायटी येथे व्यवहार करू, असे सुचवले. असिफ मुल्ला यांना संशय आल्यामुळे त्यांनी गोविंदची नजर चुकवून कराड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी मोमीन यांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत कारवाईसाठी पथक पाठवले.
असिफ मुल्ला हे गोविंदसोबत गजानन हौसींग सोसायटी येथे गेले. त्याठिकाणी सर्जेराव कदम व अधिक गुरव उपस्थित होते. तीन जणांनी मिळून बनावट सोन्याच्या १० बिस्किटांचा व्यवहार सुमारे ५० लाख रुपयांना रोख रकमेत करण्याची बोलणी सुरू केली. याचवेळी पोलीस निरीक्षक नीलेश तारू, फौजदार निखिल मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. पंच आणि सोनार यशवंत देवकर यांच्या उपस्थितीत तिघांची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्यांच्या खिशातून बनावट सोन्याची ११ बिस्किटे सापडली. पोलिसांनी गोविंद पदातुरे, सर्जेराव कदम आणि अधिक गुरव यांना ताब्यात घेतले असून, फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पथक तपास करीत आहे.