कराड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये अन्य पक्षांतील व आघाड्यांच्या नेत्यांना खेचून आणण्याचा भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांचा धडाका सुरूच आहे. आज मंगळवारी मुंबईत कराडमधील प्रभावशाली जनशक्ती आघाडीने भाजपत प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलणार असून, त्यामुळे ‘जनशक्ती’चे अध्यक्ष अरुण जाधव आणि त्यांच्या वाहिनी माजी नगराध्यक्ष शारदा जाधव यांची नावे आपसूकपणे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आली आहेत.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, विक्रम पावसकर, डॉ. अतुल भोसले यांनी जनशक्ती आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यात कराडच्या पहिल्या लोकनियुक्त व नगराध्यक्षपदाची दोनदा संधी मिळालेल्या शारदा जाधव, ‘जनशक्ती’चे अध्यक्ष व विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना, थोडक्यात विजयश्री हुकलेले अरुण जाधव, माजी नगराध्यक्ष (कै.) जयवंत जाधव यांचे पुत्र डॉ. आशुतोष, माजी नगराध्यक्ष अशोक भोसले, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय, माजी नगरसेवक शिवाजी पवार, माजी नगरसेवक आनंद पालकर, अतुल शिंदे, अरुणा शिंदे, चंदा लुणीया, विनायक विभुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, की कराडच्या राजकारणातील अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवणारा ऐतिहासिक प्रवेश डॉ. अतुल भोसले यांच्यामुळे साध्य झाला असून, त्यांनी कराड, मलकापुरात काही शिल्लकच ठेवलेले नाही. या दोन्ही नगरपालिका भाजपच्या वर्चस्वाखाली येतील.

रवींद्र चव्हाण यांनी, आजच्या पक्षप्रवेशाने देश महासत्ता होण्याच्या भाजपच्या भूमिकेला बळ मिळाल्याचे सांगितले. डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘स्वर्गीय जयवंतराव जाधव ‘लोकमान्य नगराध्यक्ष’ म्हणून ओळखले जात. तर, शारदा जाधव यांनीही दोनदा नगराध्यक्षपद भूषवले. या सर्वांचे शहराच्या सर्वांगीण प्रगतीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.’

‘शत-प्रतिशत भाजप’ची चर्चा

अलीकडेच काँग्रेस आणि दोन्ही शिवसेनेला दणका दिला. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आप्पा माने, शिवसेनेच्या कार्यकर्त्या, नगरपालिकेच्या माजी पदाधिकारी स्मिता हुलवान, शिवसेनेचे (उबाठा) स्थानिक नेते, माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांचा डॉ. भोसले यांनी मुंबईत पक्षप्रवेश घडवून आणला. तर, आता ‘जनशक्ती’च्या दिग्गजांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने ‘शत-प्रतिशत भाजप’ची चर्चा रंगू लागली.