कराड : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. काल सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली असून, कराड पालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अडीचशे अर्ज आले आहेत. कराचा आकडा निरंक (शून्य) असल्याखेरीज ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळत नसल्याने पालिकेच्या तिजोरीत चार दिवसांत ४० लाखांचा कर जमा झाला आहे.
पालिका निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक असल्याने आतापर्यंत सुमारे अडीचशे इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, कर भरण्यासाठी इच्छुक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेत गर्दी केली आहे. त्यांच्याकडून केवळ चार दिवसांत ४० लाख रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे.
कराड नगरपालिकेवर २०२२ पासून प्रशासक असल्याने गेली तीन वर्षे निवडणुकीची प्रतीक्षा होती. मात्र, आता निवडणूक जाहीर होताच शहरातील नेते, कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाले आहेत. विविध पक्ष आणि आघाड्यांच्या चर्चांना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार आपापली तयारी जोरात करत आहेत. निवडणुकीच्या घोषणेनंतर पालिकेचा परिसर नवचैतन्याने गजबजला आहे. यापूर्वी शांत दिसणाऱ्या पालिका इमारतीत आता राजकीय नेते, कार्यकर्ते व इच्छुकांची गर्दी वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर भरणे आवश्यक असल्याने अनेक इच्छुकांनी पालिकेच्या कर भरणा विभागात रांगा लावल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शनिवारी व रविवारी सुट्टी असूनही कर वसुली विभाग सुरू ठेवण्यात येत आहे.
एरव्ही कर वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या दारात जात असतात; परंतु, सध्या पालिकेत येऊन कर भरताना गर्दी दिसत आहेत. त्यात पालिकेकडे चार दिवसांत ४० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात कर भरणा होत असल्याने ही रक्कम झपाट्याने वाढणार आहे. इच्छुकांची संख्या सतत वाढत आहे. पालिकेतर्फे ना हरकत प्रमाणपत्र तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या निवडणुकीमुळे उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कराड पालिकेसाठी थेट जनतेतून नगराध्यक्ष व ३० सदस्य निवडायचे असून, त्यासाठी इच्छुकांची संख्या दोनशेवर पोहचली आहे. कराचा आकडा निरंक (शून्य) असल्याखेरीज ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळत नसल्याने पालिकेच्या तिजोरीत चार दिवसांत ४० लाखांचा कर जमा झाला आहे.
