कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार- तिबार मतदार नोंदणी झाल्याचे खळबळजनक आरोप गाजत असतानाच एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त मतनोंदणी प्रकरणात काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कुटुंबीयही सामील असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, मोहनराव जाधव, माजी नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे, राजेंद्र यादव आदींची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

मोहनराव जाधव म्हणाले, विधानसभेच्या सन २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये या बनावट नोंदींचा वापर करून मतदान चोरी झाली आहे. चव्हाण कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे कराड, मलकापूर आणि पाटण तालुक्यात आढळली आहेत. या नावांसाठी वेगवेगळे पत्ते, खोटे वय आणि चुकीची माहिती मतदार नोंदणी अर्जात दाखवण्यात आली आहे.

इंद्रजीत पंजाबराव चव्हाण हे २०२४ च्या निवडणुकीत मुख्य निवडणूक प्रतिनिधी असून, त्यांच्या नावाची दोन मतदारसंघात नोंदणी आहे. आशा इंद्रजीत चव्हाण यांचे कराडमध्ये वय ४७, मलकापूरात ४६, तर पाटण मतदारसंघात नाव आशाताई वय ४४ अशी नोंद आहे. शांतादेवी चव्हाण यांचे कराडमध्ये वय ८७, मलकापुरात ८६. तसेच अभिजित इंद्रजित चव्हाण यांचे मलकापुरात दोन वेगवेगळे पत्ते दाखवून नावे नोंदवली आहेत. राहुल विजयसिंह चव्हाण यांचे पाटण कॉलनीत वय ५३, तर कुंभारगावात वय ५२, गौरी राहुल चव्हाण यांची दोन ठिकाणी नोंदणी आहे. अधिकराव चव्हाण यांची नावे दोन ठिकाणी नोंदली आहेत.

मंगल अधिकराव चव्हाण यांचे दोन नोंदीत वयातील फरक आहे. राजेश वसंतराव चव्हाण यांचे पाटण कॉलनीत वय ५२, कुंभारगावात ५६ आहे. अशी नऊ जणांची कराड व पाटण तालुक्यात नावे आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले, पृथ्वीराज चव्हाणांच्या पाटण कॉलनीतील घराच्या पत्त्यावर एकूण १५ मतदार नोंदवले गेले आहेत. परंतु, त्यातील बहुतांश लोक प्रत्यक्षात तिथे राहत नाहीत. भाजपने निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यासह दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मतदार सत्यशोधन समितीचे नेतृत्व करणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कुटुंबीयांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर असून, तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी या वेळी केली आहे.